ठाकरेंचे शिलेदार आ.सचिन अहिर महायुतीचे उपसभापतीसाठी उमेदवार

शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

मुंबई/30 जून- महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाचे विश्वासू आणि विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षांतरानंतर त्यांनी तातडीने विधानपरिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांमधील महत्त्वाच्या नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यात महायुतीला सातत्याने यश येत आहे. यापूर्वीच ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी साथ सोडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, आता थेट मुंबईतील एक महत्त्वाचा आणि निष्ठावान आमदार फुटल्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा महायुतीचे संपूर्ण शीर्षस्थानी असलेले नेतृत्व तिथे हजर होते. या शक्तीप्रदर्शनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.या बड्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे सचिन अहिर यांच्या उमेदवारीला आणि त्यांच्या या राजकीय पाऊलाला महायुतीचे पूर्ण आणि भक्कम समर्थन असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. मात्र, या सर्व घडामोडींनंतर आता तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित होऊ लागले असून सचिन अहिर यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होणार का, याविषयी कायदेतज्ज्ञांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये तर्कवितर्क लढवले जात आहेत. विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत 13 मे 2025 रोजी संपली आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेले उपसभापती पद हे पावसाळी अधिवेशनात भरले जात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहेत. तर विधानसभेचे उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे विधान परिषदेचे उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याचे निश्चित आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button