शहीद पराग मोरे यांना अखेरचा सलाम
आ.रवी राणा यांनी पराग मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची घेतली सांत्वन भेट

अमरावती /28 जून: अमरावती येथील साई नगरमधील रहिवासी आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले वीर जवान पराग सुरेशराव मोरे हे विशाखापट्टणम येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले. या दुःखद घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या निधनाने देशाने एक शूर सुपुत्र गमावला आहे. आमदार रवी राणा यांनी पराग मोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले.
यावेळी त्यांनी शहीद पराग मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. पराग मोरे यांचे बलिदान हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मातृभूमीच्या संरक्षणासाठी त्यांनी दाखवलेले शौर्य आणि दिलेले सर्वोच्च बलिदान भावी पिढ्यांसाठी सदैव स्फूर्तिदायी ठरेल. सैनिकाच्या बलिदानामुळेच आज देश सुरक्षित असून त्यांचा त्याग शब्दांत मांडणे कठीण आहे असे भावपूर्ण उद्गार आमदार रवी राणा यांनी यावेळी काढले. मोरे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून त्यांना या कठीण प्रसंगात धीर देत शासनाकडून मिळणार्या सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आणि मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उपस्थित नागरिकांनी भारत माता की जय आणि शहीद पराग मोरे अमर रहे अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शहीद जवान पराग मोरे यांनी देशाच्या सीमा रक्षित ठेवताना हसत हसत मृत्यूला कवटाळले. त्यांचे हे राष्ट्रप्रेम आणि पराक्रम भारतीयांच्या स्मरणात सदैव तेवत राहील. शहीद कधीही मरत नाहीत ते राष्ट्राच्या स्मरणात कायम जिवंत राहतात अशा शब्दांत आमदार रवी राणा यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अमरावती येथील वीरपुत्र पराग सुरेशराव मोरे यांनी विशाखापट्टणम येथे बजावलेल्या देशसेवेदरम्यान प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आमदार रवी राणा यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.




