परशुराम रत्न पुरस्कारांनी विद्यार्थ्यांचा गौरव
14 दिग्गजांसह विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अमरावती /28 जून: अमरावती शहरातील श्री नागेश्वर मंदिर सभागृहात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित ’परशुराम रत्न 2026’ आणि ’मेधावी छात्र गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या दिमाखदार कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या 14 दिग्गजांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. न्यू विदर्भ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष निनद सोमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याने समाजातील प्रतिभावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.
निनद सोमण म्हणाले की, ब्राह्मण समाजाच्या विविध शाखांचे एकाच व्यासपीठावर एकत्र येणे ही सामाजिक ऐक्याची मोठी ताकद आहे. अशा संघटनात्मक बांधणीतूनच भविष्यात प्रभावी नेतृत्व उभे राहील आणि समाजाची अखंडता अधिक बळकट होईल. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व ज्येष्ठ पोलीस निरीक्षक सीमा दावतकर, डॉ. शशांक दुबे, डॉ. मोना चिमोटे, रेवती देशपांडे आणि ज्योती शर्मा यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला. या सोहळ्यात मिलिंद चिमोटे, स्वाती कुलकर्णी, पत्रा कौंडिण्य, ललिता रतवा, डॉ. सागर धनोरकर, वेदांग सराफ, तुषार वरंजुकर, केदार गोगरकर, अर्पणा आठवले, सविता जोशी, श्रद्धा कालिका आणि माधुरी कुलकर्णी यांना ’परशुराम रत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच, दहावी आणि बारावीत 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी आणि एमबीबीएस उत्तीर्ण डॉक्टरांना गौरवण्यात आले. शोभायात्रेत विठ्ठल-रुक्मिणीची जिवंत झांकी सादर करणारे अंबर मिश्रा आणि अस्मिता मिश्रा यांचा विशेष सत्कार झाला. डॉ. मोना चिमोटे यांनी भाषेच्या पलीकडे जाऊन संस्कार आणि पारंपरिक मूल्यांच्या जोपासनेवर भर दिला. प्रवीण जोशी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता शुक्ला यांनी केले, तर उपस्थितांचे आभारही त्यांनीच मानले.




