विशाखापट्टणमच्या सरावात अमरावतीचा सुपुत्र पराग मोरे शहीद

लष्करी इतमामात वीरपुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

बंदुकीची गोळी लागल्याने सैनिकाचा दुर्दैवी अंत

अमरावती /22 जून -भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावणारे अमरावतीचे सुपुत्र पराग सुरेशराव मोरे विशाखापट्टणम येथे लष्करी सरावादरम्यान बंदुकीची गोळी लागून शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर आज स्थानिक हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहीद पराग मोरे (43) हे वयाच्या 18 व्या वर्षी सैन्य दलात भरती झाले होते. विशाखापट्टणम येथील तुकडीत ते कार्यरत असताना दोन दिवसांपूर्वी सरावा दरम्यान त्यांना गोळी लागली. त्यांचे पार्थिव साईनगर परिसरातील खंडेलवाल नगर येथील महर्षी इमारतीमधील राहत्या घरी आणले तेव्हा संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, लहान भाऊ, 3 वर्षांची मुलगी, 5 वर्षांचा मुलगा आणि विवाहित बहीण असा मोठा परिवार आहे. ’पराग मोरे अमर रहे’ अशा घोषणा देत निघालेल्या अंत्ययात्रेत विशाखापट्टणम सैन्य दलाचे अधिकारी, शहर पोलीस दलाचे अधिकारी आणि अमरावतीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लष्कराच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या 3 फेर्‍या झाडून आपल्या लाडक्या वीरपुत्राला अखेरची मानवंदना दिली. शहीद सैनिकाचा परिवार भाऊक-पराग मोरे यांनी लहान वयात देशसेवा स्वीकारली. त्यांच्या जाण्याने मोरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मागे वृद्ध आई, पत्नी, लहान भाऊ आणि दोन चिमुकली मुले असा परिवार पोरका झाला. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यावर शोककळा पसरली असून गावकर्‍यांचे डोळे पाणावले आहेत.

Back to top button