चिमुकल्यांच्या चिक्कीमध्ये निघाल्या अळ्या
पथ्रोट, खोडगाव अंगणवाडीतला संतापजनक प्रकार

प्रशासनाच्या हलगर्जीपणाने निरागस जीव धोक्यात
जबाबदारांवर कारवाईची पालकांची मागणी
पथ्रोट /10 जून – बालकांच्या पोषणासाठी शासनाकडून पुरविण्यात येणार्या आहारातच अळ्या आणि किडे आढळल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पथ्रोट येथील वार्ड क्र. 6 खोडगाव रस्ता परिसरातील अंगणवाडी केंद्रातून वितरित करण्यात आलेल्या शेंगदाणा चिक्कीमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोषण आहाराच्या नावाखाली चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप पालकांनी करत संबंधित अधिकारी व पुरवठादारांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निकिता अनिल दांडगे या मंगळवारी अंगणवाडीतून पोषण आहार घेऊन घरी परतल्या. त्यांचा मुलगा विश्व अनिल दांडगे (वय 3) याच्यासाठी देण्यात आलेले शेंगदाणा चिक्कीचे पाकीट उघडताच त्यामध्ये पांढर्या अळ्या व लालसर किडे फिरताना दिसले. हा प्रकार पाहून कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. अंगणवाड्यांमध्ये शून्य ते 3 वर्षे वयोगटातील बालकांना पुरविण्यात येणार्या आहाराची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असतानाही निष्काळजीपणा झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पुरवठ्यापासून वितरणापर्यंत कोणतीही प्रभावी तपासणी झाली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणामुळे महिला व बालविकास विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींना पाठीशी घालण्याऐवजी कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी वैभवकुमार मापते यांनी दिली. पोषण आहार की मृत्यूचा सापळा-बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी वितरित होणार्या पोषण आहारात अळ्या आढळणे ही केवळ चूक नसून गंभीर प्रशासकीय बेफिकिरी मानली जात आहे. संबंधित विभागाने वेळेत तपासणी केली असती तर हा प्रकार घडला नसता. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी करण्याची मागणी आता तीव्र झाली आहे.




