नवनित राणांची विचारधारा काँग्रेस राष्ट्रवादीशी सुसंगत
बच्चू कडूंची राणा दाम्पत्यांवर टीका

शिवसेनेत प्रवेशाची खुली ऑफर
अमरावती/10 जून – शहराच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व आ. बच्चू कडू यांनी माजी खा. नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नवनीत राणा या मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेच्या आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची संधी सोडायला नको होती, असे सूचक विधान कडू यांनी केले आहे. अमरावती आणि मुंबईच्या राजकीय वर्तुळात या विधानाची जोरदार चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याच्या राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे नेहमीच अनपेक्षित राहिली असून, कधी कोणता राजकीय बॉम्ब फुटेल याचा नेम नसतो. सध्या अमरावतीत विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, दुसरीकडे राज्यसभेच्या रिक्त जागेवरून महायुतीत मोठी ओढाताण पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जवळच्या नेत्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते. त्यात भाजपच्या नेत्या व माजी खा. नवनीत राणा यांचे नाव चर्चेत होते. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेटही घेतली होती, मात्र राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी न देता ऐनवेळी राजेंद्र जैन यांना रिंगणात उतरवले. याच पार्श्वभूमीवर आ. कडू यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नवनीत राणांची विचारधारा सुरुवातीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीशी मिळती जुळती राहिली आहे. कडू यांनी हा मुद्दा उपस्थित करून अजित पवार गटाच्या नेत्यांना एक प्रकारे राजकीय इशाराच दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी नवनीत राणांसाठी राजकीय दरवाजे उघडे असल्याचे संकेत दिले आहेत. जर राणांना वाटत असेल, तर त्यांनी प्रहार किंवा शिंदे गटात येण्यास काहीच हरकत नाही, असे विधान करून कडू यांनी एक प्रकारे ’ओपन ऑफर’ दिली आहे. यावर राणा दाम्पत्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र स्थानिक पातळीवर याचे पडसाद उमटत आहेत. आगामीस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर आ. कडू यांचे हे विधान राजकीय समीकरणांना नवी दिशा देणारे ठरू शकते.
राजकीय वारे आणि बदलती गणिते-अमरावतीच्या राजकारणात नवनीत राणा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकत स्वतःची ओळख निर्माण केली होती. मात्र, त्यानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांच्या भूमिकांवर वारंवार चर्चा होत राहिल्या आहेत. आ. बच्चू कडू यांनी केलेले हे विधान केवळ टीका नसून, आगामी काळातील संभाव्य युती आणि नव्याने जुळणार्या राजकीय समीकरणांची ही नांदी मानली जात आहे. सध्या सर्व लक्ष राणा दाम्पत्याच्या पुढील निर्णयावर आणि होणार्या राजकीय घडामोडींवर केंद्रित झाले आहे.




