पंढरपूर वारीसाठी 254 विशेष एसटी बसेसची सोय

17 ते 31 जुलै पर्यंत राहणार फेर्‍य ांचे नियोजन

गावागावांतून आता थेट पंढरीची वारी भक्तांसाठी सुलभ

अमरावती/8 जुलै- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी अमरावती जिल्ह्यातील एसटी
आगारातून 254 विशेष बसेस सोडण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 36
जादा बसेसचे नियोजन करण्यात आले असून, ही विशेष बससेवा 17 जुलै ते 31 जुलै या कालावधीत उपलब्ध राहणार
आहे. पंढरपूरला जाण्यासाठी 17 जुलैपासून बसेसची संख्या वाढवण्यात येणार असून 28 जुलैपर्यंत भाविकांना पंढरपुरात पोहोचवले जाईल, तर 28 ते 31 जुलै या काळात परतीचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी विशेष फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील आठ एसटी आगारांतून सुटणार्‍या या सर्व बसेसचा अंतिम थांबा पंढरपूर येथील भीमा बस स्थानकावर असेल. भाविकांना तेथेच उतरवले जाईल आणि परतीच्या प्रवासासाठी याच ठिकाणाहून बसेस मिळतील. महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून, महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटाच्या दरात 50 टक्के सवलत मिळेल, तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना
मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या या प्रवासासाठी प्रामुख्याने लालपरी एसटी बसेसचा वापर केला जाणार आहे. जर एखाद्या गावातून 40 किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी पंढरपूरला जाण्यासाठी मागणी केली, तर त्या
गावापासून थेट विशेष बस सेवा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी इच्छुक भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा म्हणून एसटीचे वाहतूक
नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत ताळमेळ राखून वाहतूक व्यवस्था सांभाळणार आहेत.
वारीसाठी विशेष सोयीचे नियोजन पंढरपूर वारीसाठी महामंडळाने कंबर कसली असून भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता 254 बसेस सज्ज ठेवल्या आहेत. ग्रामीण भागातील भाविकांना मोठा दिलासा देण्यासाठी किमान 40 प्रवाशांची मागणी असल्यास गावातूनच थेट बस पाठवण्याचे नियोजन केले आहे. महिलांसाठी निम्म्या दरात प्रवास, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासामुळे वारीचा प्रवास आता खर्‍या अर्थाने स्वस्त आणि सुसह्य होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button