तीन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू
यवतमाळमधील जाजू महाविद्यालयात शोककळा

यवतमाळ/17 ऑगस्ट : शहरालगत असलेल्या टाकळी तलाव येथे पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. तिन्ही विद्यार्थी हे जाजू महाविद्यालयातील बीएससी कॉम्प्युटर अभ्यासक्रमाला होते. बचाव पथकाने तिघांचाही तलावात शोध सुरू केला. सायंकाळी 7.30 वाजता तीन मृतदेह हाती लागले.
पियुष विनोद यादव (19 रा. पिंपळगाव), प्रथमेश सुनील यादव (19 रा. बालाजी पार्क पिंपळगाव), प्रसाद नितीन सातपुते (19 रा. बोरगावपुंजी ता. आर्णी) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकीने सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास टाकळी येथील तलाव परिसरात पोहोचले. त्यांनी तेथे फोटोशूट केल्यानंतर तिघेही पोहण्यासाठी तलावात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. या विद्यार्थ्याची कॉलेज बॅग, कपडे, चप्पल काठावर पडून होते. टाकळी ग्रामस्थांना यावरून संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तातडीने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. महसूल पथक, बचाव पथक तेथे आले. तिघांची ओळख पटल्यानंतर त्यांची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. या घटनेने पिंपळगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पियुष व प्रथमेश हे दोघेही चुलत भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. तर प्रसाद हा बोरगावपुंजी येथून शिक्षणासाठी यवतमाळात आला होता, अशी माहिती ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली. बचाव पथक बुडालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत असताना त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. टाकळी ग्रामस्थांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. ग्रामीण ठाणेदार प्रवीण मानकर, तलाठी घटनास्थळी उपस्थित होते.




