एसटी बसची दुचाकीला जबर धडक; एकाचा मृत्यू
आराळा फाट्याजवळील भीषण अपघातात दोन जण जखमी

दर्यापूर-अमरावती मार्गावर वाहतूक कोंडी
दर्यापूर /17ऑगस्ट– नागपंचमीच्या दिवशी दर्यापूर-अमरावती मार्गावर आराळा फाट्याजवळ राज्य परिवहन बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 30 वर्षीय छोटेलाल सुखलाल डिकारे यांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. मृतक व जखमी आदिवासी मजूर असून ते शेतीकामासाठी दर्यापूर येथे आले होते. अपघातानंतर रुग्णसेवकांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून जखमींना दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेमुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
खल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आराळा-बोराळा रस्ता ओलांडताना हा अपघात घडला. अमरावतीहून दर्यापूरकडे जाणार्या राज्य परिवहन बसची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक एवढी जबर होती की बैतुल जिल्ह्यातील छोटेलाल सुखलाल डिकारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक विकी होले व सचिन शेलारे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. सुमारे 12 किलोमीटरचे अंतर अवघ्या पाच मिनिटांत पार करून त्यांनी जखमींना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यापैकी एका व्यक्तीला मृत घोषित केले.
अपघाताची बातमी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. दर्यापूर-अमरावती मार्गाच्या दोन्ही बाजूंनावाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. खल्लार व दर्यापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, जखमींना मदत करण्यासाठी अंकुश कावडकर, नितेश वानखडे, राहुल भुम्बर, शुभम होले, हेमंत उमाळे यांच्यासह इतर सहकारी उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. अपघाताचे नेमके कारण तसेच मृतक व जखमींची अधिकृत ओळख तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
मदतीसाठी धावले रुग्णसेवक-आराळा फाट्याजवळ अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक विकी होले व सचिन शेलारे यांनी वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 12 किलोमीटर अंतर अवघ्या पाच मिनिटांत पार करून त्यांनी गंभीर जखमींना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार मिळण्यास मदत झाली. अपघातानंतर नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.




