बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू

वीजेची तार पडल्याच्या अफवेने उडाला गोंधळ 15 हून अधिक भाविक जखमी

बिहार /17 ऑगस्ट : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावणच्या तिसर्‍या सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. जलाभिषेकासाठी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. सकाळी सुमारे 6.40 वाजण्याच्या सुमारास अचानक चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांची रांग अशोकधाम हॉल्टपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी हॉल्टवर दोन रेल्वे गाड्या थांबल्या होत्या. अचानक वीजेचा एक खांब कोसळला. हा खांब पुरुषांच्या रांगेच्या दिशेनेपडला. खांब पडल्याचे पाहून काही वेळातच लोकांमध्ये वीजेची तार पडल्याची अफवा पसरली. प्रत्यक्षात ती केबल वायर होती.
या अफवेमुळे महिलांच्या रांगेत मोठी घबराट निर्माण झाली. गर्दीचा दबाव वाढल्याने अनेक महिला एकमेकींवर पडल्या आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. प्रशासन आणि पोलीस पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर परिसरात तैनात होते. मात्र ही घटना अवघ्या काही मिनिटांत घडल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
घटनेनंतर जखमींना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये सर्व महिला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मृतांची नेमकी संख्या आणि घटनेमागचे कारण याबाबत तपास सुरू आहे.लखीसरायचे एसडीपीओ शिवम कुमार यांनीही 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. वीजेचा खांब पडल्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि त्यातून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली असावी, अशी प्राथमिक शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
उज्जैनमध्ये चेंगराचेंगरी, 13 गंभीर
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. विजेचा धक्का बसल्याच्या अफवा पसरल्या, ज्यामुळे लोक एकमेकांवर पडले. वाढलेल्या दाबामुळे 13 जणांची प्रकृती बिघडली. पोलिसांच्या माहितीनुसार, भगवान नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी अंदाजे 40 हजार भाविक रांगेत उभे होते. आतापर्यंत अंदाजे साडे पाच लाख भाविकांनी मंदिराला भेट दिली आहे. हे मंदिर महाकाल मंदिराच्या तिसर्‍या मजल्यावर असून ते फक्त नागपंचमीला उघडले जाते. जखमी भाविकांना उज्जैन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

संबंधित बातम्या

Back to top button