आयकर भवन इमारतीला भीषण आग
चर्चगेट स्थानक परिसरात धुराचे लोट

मुंबई /17 ऑगस्ट – चर्चगेट स्थानकाच्या शेजारीच असलेल्या आयकर भवनच्या इमारतीला सोमवारी (17 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. आयकर भवनच्या तळघरातून धुराचे प्रचंड लोट येऊ लागल्याने चर्चगेट स्थानक परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या तब्बल 8 गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी वेगाने आगीवर नियंत्रण मिळवले. दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाने वरच्या मजल्यांवर अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.




