विधानपरिषद निवडणुकीत नगरसेवकच हुकुमी एक्का
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची निवडणुक न झाल्याने मतदान नाही

विदर्भातील पाच जागांवर चुरस वाढली मतदार मनधरणीसाठी नेते मैदानात उतरले
अमरावती/18 मे- राज्य विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सर्वच प्रमुख पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीसाठी 25 मे रोजी अधिसूचना निघणार असून 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल, तर 22 जून रोजी मतमोजणी करून निकाल घोषित केला जाणार आहे.भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधत प्रत्यक्ष गाठीभेटी सुरू केल्या आहेत. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निर्वाचित सदस्य मतदान करणार असून एकूण 453 मतदार पात्र ठरले आहेत. निवडणूक जाहीर झाल्याने संभाव्य उमेदवारांची नावे चर्चिली जात असून राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र वाढले आहे. या वेळची निवडणूक अत्यंत वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका न होताच ही निवडणूक पहिल्यांदाच होत आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या 59 जागा आणि 14 पंचायत समिती सभापती पदे रिक्त असल्याने हे लोकप्रतिनिधी मतदार यादीत समाविष्ट नाहीत. त्यामुळे एकूण मतदारसंख्या 526 वरून थेट 453 वर आली आहे. ग्रामीण भागातील हे मोठे प्रतिनिधित्व कमी झाल्यामुळे विजयाची गणिते आणि पक्षांची रणनीती पूर्णपणे बदलली आहे. आता केवळ नागरी भागातील मतदारांच्या हाती विजयाची किल्ली असल्याने उमेदवारांनी शहरांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. उमेदवारांची अधिकृत घोषणा झाल्यानंतर हा सामना आणखी रंजक होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
मतदार घटल्याने रणनीती बदलली-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्याने यंदा मतदारांची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे उमेदवारांना आता केवळ महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या सदस्यांवरच पूर्ण भर द्यावा लागत असून प्रचाराची गणिते पूर्णपणे बदलली आहेत.




