दिशा सालियन प्रकरणात सीबीआय चौकशी करा
आश्वासन समितीचे गृह विभागाला कडक निर्देश

* अटल सेतूवर चोवीस तास शस्त्रधारी रक्षक
अमरावती/18 मे- दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून म्हणजेच सीबीआय कडून तातडीने फेरचौकशी करण्याचे आदेश विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी आज दिले. मुंबईत पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत गृह विभागाशी संबंधित तब्बल चोपन्न प्रलंबित आश्वासनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या वेळी राज्यातील कायदा, सुव्यवस्था, सुरक्षा आणि विविध विभागांतील घोटाळ्यांवर समितीने कडक भूमिका घेत थेट फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा म्हैसकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकार्यांनी बनावट पावत्या बनवून पैशांची अफरातफर केल्याचे उघड झाले असून त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुंबईतील अटल सेतू टोलनाक्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून तिथे चोवीस शस्त्रधारी रक्षक तैनात करण्याचे व पंधरा दिवसांत हेल्पलाईन बॉक्स बसवण्याचे निर्देश दिले आहेत. चेंबूरमधील पालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहारामुळे झालेल्या विषबाधेची गंभीर दखल घेत संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कोकणातील मुरुड समुद्रकिनार्यावरील बंद असलेले सव्वीस छुप्या कॅमेर्यांचे यंत्र तातडीने सुरू करण्याचे आणि श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली व महाराष्ट्र पोलिसांनी समन्वय साधून पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या सूचना दिल्या. महामंडळाच्या बस अपघातात मृत झालेल्यांच्या वारसांना नोकरी व अपंगत्व आलेल्यांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचेही सांगण्यात आले. या बैठकीला आमदार अमित झनक, विक्रम पाचपुते, राजेश पवार, समीर मेघे, अनुप अग्रवाल, विनोद अग्रवाल, सचिन कल्याण शेट्टी, पराग शहा, रमेश कराड, किशोर पाटील, अमोल पाटील, प्रदीप जयस्वाल, किरण सामंत, हिरामण खोसकर, संजय बनसोडे, दौलत दरोडा, वरुण सरदेसाई आणि राजू खरे हे सदस्य उपस्थित होते. तसेच अधिकारी वर्गातून अनिल अनिल कोकाटे, प्रदीप पडोळे, स्वप्निल कदम, सचिन सानप, महेंद्र अलींबेकर, सुनील साळुंखे व विनायक जाधव उपस्थित होते.




