मजीप्रा कंत्राटदारांची थकीत रक्कम मजीप्राच्या खात्यात जमा

आ.संजय खोडके यांच्या प्रयत्नाने मजीप्रा कंत्राटदारांना मोठा दिलासा

अमरावती /18 मे-  अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागील वर्षभरापासून रखडलेल्या कामांच्या देयकांसाठी अखेर 14 कोटी 66 लाखांची रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावतीच्या एसबीआय बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या बाबत महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खोडके यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असल्याने मजीप्रा कंत्राटदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागील वर्ष 2025-2026 च्या 15.31 कोटींची देयके मागील वर्षभरापासून रखडली असल्याने कंत्राटदारांनी मजीप्रा कार्यालयावर आंदोलन पुकारले होते. सतत आठवडाभर आंदोलन करण्यात आल्याने मजीप्राची कामे प्रभावित होऊन अमरावती शहरातील पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत होण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान गेल्या 14 मे रोजी महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खोडके यांनी मजीप्रा कंत्राटदारांच्या काम बंद आंदोलनाला भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील कंत्राटदारांनी केलेल्या कामांचे मोबदले गेल्या एक वर्षापासून शासनाकडे थकीत होते. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने कंत्राटदार बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत संपाचे हत्यार उपसले होते. ’आम्ही केलेल्या कामाचे हक्काचे पैसे आम्हाला मिळावेत’ आणि ’प्रलंबित देयकांशिवाय नवीन काम करणार नाही’ अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली होती. या गंभीर पेचप्रसंगात महाराष्ट्र विधान परिषद सदस्य – संजय खोडके यांनी लक्ष घालून कंत्राटदारांच्या मागण्या लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या प्रभावी मध्यस्थीमुळे मजीप्रा कंत्राटदारांनीं आपले आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. दरम्यान आ.संजय खोडके यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला असता प्रशासकीय हालचालींना वेग आला असल्याने अशातच आता मजीप्रा कंत्राटदारांची वर्षभरापासूनची थकीत देयके अदा करण्यासाठी 14.66 कोटीची रक्कम मजीप्राच्या एसीबीआय खात्यात जमा करण्यात आली आहे. या संदर्भात आ.संजय खोडके यांच्या प्रयत्नाने मजीप्रा कंत्राटदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button