भर दिवसा दर्यापूरात युवकाची निर्घृण हत्या

अवघ्या दोन तासांत आरोपी जेरबंद; शहरात भीतीचे वातावरण

अमरावती न्यायवैद्यक पथक दर्यापुरात दाखल

दर्यापूर/17 मे रविवारच्या भर दुपारी दर्यापूर शहरातील आनंदनगर परिसरात झालेल्या थरारक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले. प्रजल देवानंद तायडे या अवघ्या 19 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेनंतर दर्यापूर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवित अवघ्या दोन तासांत आरोपी कुणाल प्रवीण गावंडे याला
जेरबंद केले. अमरावती येथील न्यायवैद्यक पथकही तपासासाठी दर्यापुरात दाखल झाले
असून संपूर्ण शहर शोकमग्न झाले आहे.
दर्यापूर शहरातील आनंदनगर परिसरात रविवार रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रजल देवानंद तायडे व आरोपी कुणाल प्रवीण गावंडे यांच्यात काही दिवसांपासून वाद व गैरसमज निर्माण झाल्याची माहिती पुढे येत आहे. याच कारणातून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात प्रजल तायडे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. अचानक झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रजल तायडे याला नागरिकांच्या मदतीने तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. अवघ्या 19 वर्षांच्या युवकाचा अशा क्रूर पद्धतीने मृत्यू झाल्याने आनंदनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीकुणाल प्रवीण गावंडे वय 21 वर्ष रा. आनंदनगर याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी शहरात वाढत्या गुन्हेगारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
दर्यापूरसारख्या शांत शहरात भर दिवसा युवकाची हत्या होणे ही अत्यंत धक्कादायक बाब मानली जात आहे. किरकोळ कारणांवरून वाढणारे वाद थेट जीवावर उठत असल्याचे चित्र समोर येत असून युवकांच्या हातात वाढती धारदार शस्त्रे समाजासाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. कायद्याची भीती कमी होत चालल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अमरावती येथील न्यायवैद्यक पथक दर्यापुरात दाखल झाले आहे. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. दर्यापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून जोराने पुढे येत आहे.
तरुणाईत वाढती हिंसा चिंतेचा विषय-अल्प कारणांवरून थेट जीवघेणे हल्ले घडत असल्याने पालकांसह नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. युवकांच्या हातात सहज पोहोचणारी धारदार शस्त्रे आणि वाढती आक्रमकता यामुळे समाजात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होत असून कठोर नियंत्रणाची मागणी पुढे येत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button