भारत-नेदरलँडमध्ये 17 द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी

पाणी, कृषी, आरोग्य, शिक्षण,संरक्षण आदि क्षेत्रांतील सहकार्याला गती

नवी दिल्ली/17 मे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड दौर्यारदरम्यान भारत आणि नेदरलँड यांच्यातील संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले आहेत. या दौर्यांत पंतप्रधान मोदी आणि त्यांचे डच समकक्ष रॉब जेटन यांनी संरक्षण आणि दुर्मीळ खनिजे यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्याला गती देण्यासाठी 17 करारांवर स्वाक्षर्याी केल्या.
पंतप्रधान मोदी आणि जेटन यांच्यातील चर्चेनंतर भारत आणि नेदरलँड यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सेमीकंडक्टर्स, अंतराळ, एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंगसह तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंधांना चालना देण्यासाठी सामरिक भागीदारी आराखडा जाहीर केला.
जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणाच्या दृष्टीने दोन्ही देशांनी ग्रीन अँड डिजिटल सी कॉरिडॉर स्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे. भारत आणि युरोप दरम्यान पर्यावरणास अनुकूल आणि डिजिटली एकात्मिक सागरी मार्ग तयार करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमामुळे युरोपीय बाजारपेठांमध्ये ’ग्रीन हायड्रोजन’चा एक प्रमुख निर्यातदार बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला मोठे बळ मिळेल. याशिवाय, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून दोन्ही देश बॅटरी स्टोरेज, बायोएनर्जी आणि कचर्‍यापासून ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांवर एकत्र काम करतील.
संरक्षण, सुरक्षा आणि स्थलांतर-नेदरलँड्सने इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपले धोरणात्मक सहकार्य वाढवताना भारतासोबत नौदल सहकार्य मजबूत करणे आणि सागरी सराव वाढवण्यावर संमती दर्शवली आहे. दहशतवाद, सायबर गुन्हेगारी आणि उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांविरुद्ध सहकार्य करण्यासोबतच परस्पर कायदेशीर सहाय्य करार आणि नवीन प्रत्यार्पण कराराचा पाठपुरावा केला जाईल. विद्यार्थी, संशोधक आणि कुशल व्यावसायिकांच्या कायदेशीर आणि सुलभ हालचालींसाठी आणि बेकायदेशीर स्थलांतराला आळा घालण्यासाठी ’मोबिलिटी अँड मायग्रेशन’ करारावर स्वाक्षरी करण्यात आली

पाणी, कृषी, आरोग्य, शिक्षण करार

पाणी व्यवस्थापनातील कौशल्याचा भारताला फायदा होणार आहे. दोन्ही देशांनी आपली ’वॉटर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’ 2027 च्या पुढेही नूतनीकरण करण्याचे मान्य केले आहे. गंगा खोर्‍यासह इतर नद्यांचे व्यवस्थापन आणि पूर नियंत्रणावर एकत्र काम केले जाईल. तसेच गुजरातच्या महत्त्वाकांक्षी ’कल्पसर प्रकल्पा’साठी तांत्रिक सहकार्याच्या पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. हवामान-अनुकूल शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी पश्चिम त्रिपुरा येथे ’फ्लॉवर्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ आणि बेंगळुरू येथे ’डेअरी ट्रेनिंग ऑफ एक्सलन्स’ स्थापन केले जाईल.तंत्रज्ञानासाठी विशेष शैक्षणिक करार झाला आहे. संसर्गजन्य रोग, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स आणि रोग देखरेखीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ’आयसीएमआर’ आणि डच ’नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पब्लिक हेल्थ’ यांच्यात भागीदारी झाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button