कब्रस्तानात दफन केलेला विवाहितेचा मृतदेह बाहेर काढला

संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस बंदोबस्तात प्रेत उकरले

नातेवाइकांच्या तक्रारीवरून इनकॅमेरा तपासणी

अमरावती /17 मे नागपूर येथे सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू झालेल्या अमरावतीच्या फाजिला जबीन या विवाहितेचा दफन केलेला मृतदेह रविवारी पोलीस बंदोबस्तात कब्रस्तानातून बाहेर काढण्यात आला. सासरच्या लोकांनी घातपात केल्याचा थेट आरोप मुलीच्या माहेरच्यांनी केला आहे.
नातेवाइकांच्या तीव्र तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तहसीलदार, न्यायवैद्यक पथक आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत हे शव बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात छायाचित्रणासह शवविच्छेदनासाठी पाठवले. दफन केलेले प्रेत पुन्हा बाहेर काढण्याची अमरावती शहरातील ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील सौदागरपुरा परिसरातील फाजिला अब्दुल हसन या तरुणीचा विवाह जानेवारी महिन्यात नागपूरच्या मोहम्मद जबीन याच्यासोबत झाला होता. 15 मे रोजी फाजिलाचा नागपुरात अचानक मृत्यू झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कब्रस्तानात तिचा दफनविधी उरकून घेतला. या अंत्यविधीच्या वेळी मुलीच्या माहेरचे लोक उपस्थित होते.
तेव्हा फाजिलाच्या शरीरावर काही संशयास्पद जखमांच्या खुणा आढळून आल्याने माहेरच्या लोकांना घातपाताचा संशय आला. त्यांनी तातडीने अमरावती पोलीस ठाण्यात सखोल चौकशीची मागणी करणारी तक्रार नोंदवली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने रविवारी स्थानिक कब्रस्तानातून फाजिलाचे शव बाहेर काढण्याची प्रक्रिया पार पाडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रुग्णालय आणि कब्रस्तान परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button