सुझान रुग्णालयात कर्करोग तज्ज्ञांची विशेष तपासणी
जनजागृतीतून कर्करोग तपासणी उपचाराचे महत्त्व तज्ज्ञ नागरिकांना सांगणार

डॉ.भरत वसवाणी महिन्याच्या शेवटी देणार विशेष सल्ला
अमरावती /25 ऑगस्ट : कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासोबतच आजाराची लक्षणे वेळीच ओळखून तपासणी आणि उपचार सुरू करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सुझान सर्जिकल कॅन्सर रुग्णालयात शनिवारी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कर्करोग तज्ज्ञ डॉ. भरत वसवाणी नागरिकांशी संवाद साधून विविध प्रकारच्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. शनिवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे, वेळेवर तपासणी, आधुनिक उपचारपद्धती आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व समजावून सांगितले जाणार आहे. नागरिकांना तज्ज्ञांकडून कर्करोगाशी संबंधित प्रश्नांची उत्तरेही मिळणार आहेत. डॉ. राजेंद्रसिंह अरोरा, डॉ. नीता अरोरा, डॉ. डी. जी. आडवाणी, डॉ. कनक दीपसिंह अरोरा, डॉ. फरीद अहमद आणि गगनदीप सिंह साहनी यांची उपस्थिती राहणार आहे. डॉ. भरत वसवाणी हे डोके व मानेचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, रक्तविकार, मूत्रजननेंद्रियातील दुर्धर आजार आणि बहुविध अस्थिमज्जा विकाराच्या उपचारातील तज्ज्ञ आहेत. याशिवाय यशोदा रुग्णालय हैदराबाद आणि सुझान कॅन्सर रुग्णालय अमरावती यांच्यात तज्ज्ञ सल्ल्यासाठी करार झाला असून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ते सुझान रुग्णालयात उपलब्ध राहणार आहेत.
विशेष माहिती-कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे उपचारासाठी महत्त्वाचे ठरते. शनिवारी होणार्या जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना तपासणीची गरज, उपचारपद्धती आणि आरोग्याची नियमित तपासणी याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. डॉ. भरत वसवाणी दुपारी 3 वाजेपर्यंत कर्करोगग्रस्त रुग्णांना विशेष सल्ला देणार आहेत. नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.




