सेक्स स्कॅडलच्या चौकशीसाठी एसआयटी चार अटकेत, दोन ताब्यात
आरोपींना 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

18 चित्रफिती आणि 39 छायाचित्रे प्रसारित केल्याचे उघड
विशेष पथकात 10 पोलीस अधिकारी व 36 कर्मचारी
परतवाडा/15 एप्रिल – अमरावती जिल्ह्याला हादरवून टाकणार्या परतवाडा येथील अश्लील चित्रफीत प्रकरणात आता पोलिसांनी आपला फास आवळला आहे. या गंभीर गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी चक्क 46 जणांचे जम्बो विशेष तपास पथक स्थापन केले असून, आतापर्यंत चार मुख्य नराधमांना गजाआड केले आहे. 18 अश्लील चित्रफिती आणि 39 छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर आता त्यांच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोजर चालवून प्रशासनाने गुन्हेगारांमध्ये मोठी धडकी भरवली आहे.
जिल्हा हादरवून टाकणार्या परतवाडा आणि अचलपूर परिसरातील लैंगिक छळ आणि अश्लील चित्रफीत प्रकरणात पोलिसांनी आता मोठी कारवाई सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून कोवळ्या वयातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे शारीरिक शोषण करणे आणि त्या कृत्याचे गुपचूप चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर पसरवण्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी 10 पोलीस अधिकारी आणि 36 कर्मचार्यांचे एक जम्बो विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकाने आतापर्यंत अयान अहमद, उजेर खान, सहाद आणि तबरेज या चार मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांना 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परतवाडा परिसरात काही दिवसांपासून काही अश्लील चित्रफिती फिरत असल्याने मोठी खळबळ उडाली होती. एका अल्पवयीन मुलीने हिंमत दाखवून तक्रार दिल्यानंतर हे संपूर्ण काळं कृत्य उघडकीस आले. अयान अहमद तन्वीर अहमद नावाच्या तरुणाने परिसरातील अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले होते. या धक्कादायक प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी संशयावरून नयन नावाच्या एका व्यक्तीलाही ताब्यात घेतले आहे, ज्याने मुख्य आरोपी अयान याला खोली भाड्याने दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना आतापर्यंत 8 पीडित मुलींची ओळख पटवण्यात यश आले असून, ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा मुळापासून तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व अचलपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार करत आहेत. या फौजेत अनुभवी अधिकार्यांचा भरणा करण्यात आला आहे. यामध्ये परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पीआय सुरेश मनेवार, ग्रामीण अपराध शाखा प्रमुख पीआय किरण वानखडे, सायबर पोलीस ठाण्याचे पीआय अशोक लांडे, एपीआय अनूप वाकडे, एपीआय गौतम इंगळे, भरोसा सेलच्या एपीआय प्रियंका भोयर, सायबर सेलचे एपीआय संतोष गुजर, चांदूर रेल्वेच्या पीएसआय वीणा पाढे, परतवाडा पोलीस ठाण्याच्या पीएसआय स्नेहल आडे, गुन्हे शाखेचे पीएसआय सागर हटवार आणि वाचक शाखेचे पीएसआय प्रभाकर बोदडे यांचा समावेश आहे. या तपास पथकाला बळ देण्यासाठी 46 कर्मचार्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. यामध्ये समरसपुरा पोलीस ठाण्याचे पीएसआय सुधीर काले, पीएसआय दीपक राऊत, नीलेश काले, पल्लवी खांडे, रवींद्र बावने, बलवंत दामोणे, भूषण पेठे, पंकज फाटे, सचिन मिश्रा, विजय राठोड, अमोल लवणकर, शैलेश तिवारी, मंजू ढगे, शीतल वाकोडे, राजेंद्र कंकाले, सारिका अट्टरे, सचिन होले, सुधीर राऊत, पुरुषोत्तम बावनेर, श्रीकांत वाघ, सुचिता इंगळे, सुधा बेलसरे, सचिन भोंबे, नापोकां अजीत राठोड, पोकां प्रवीण बाखडे, आशिष मुंडे, पवन ढोके, संदीप जुगनाके, शिवा शिरसाट, शुभम शर्मा, सचिन कोंधणे, राहुल रबस्र्थन, नितीन कलमदे आणि अक्षय मोहोड यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचार्यांना इतर कोणतीही कामे न देता केवळ याच गुन्ह्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी भ्रमणध्वनीमधील माहिती पुसून टाकली होती, मात्र सायबर तज्ज्ञांच्या मदतीने ती पुन्हा मिळवण्यात येत आहे. या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा असल्याने पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास चक्रे फिरवली आहेत. पीडित मुलींनी न घाबरता पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, त्यांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल अशी ग्वाही दिली आहे. खा. अनिल बोंडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. आता या विशेष पथकाच्या माध्यमातून दोषींना कठोर शासन करण्यासाठी पोलीस रात्रंदिवस एक करत आहेत.




