तरूणांनो ! व्यसनाधिनता आणि सायबर फसवणुकीपासून सावध रहा
पोलीस महानिरिक्षक रामनाथ पोकळे यांचे आवाहन

अमरावती /9 मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जे अफाट धाडस दाखवलं, गडकिल्ले बांधले आणि आरमाराची उभारणी केली, तोच वारसा आजच्या तरुण पिढीने जपायला हवा. आजच्या काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होण्यासाठी तरुणांनी व्यसनांपासून चार हात लांब राहणे आणि वाढत्या सायबर फसवणुकीला बळी न पडणे हीच काळाची गरज आहे, असे परखड मत अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने चिखलदरा येथे आयोजित राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्यावर चिंता व्यक्त करत, सायबर विश्वातील धोक्यांपासून सावध राहण्याचा ’गुरुमंत्र’ विद्यार्थ्यांना दिला.
चिखलदर्याच्या निसर्गरम्य परिसरात 7 ते 11 मार्च दरम्यान हे शिबिर रंगणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते होते. यावेळी व्यासपीठावर राज्य संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. राजेश जयपुरकर, स्वाती पोकळे, डॉ. निलेश कडू आणि डॉ. राजीव बोरकर यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे समन्वयक उपस्थित होते. रामनाथ पोकळे पुढे म्हणाले की, सध्या अमली पदार्थांचे जाळे वेगाने पसरत असून त्यामुळे केवळ एक व्यक्ती नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि पर्यायाने देशाचे नुकसान होत आहे. सोशल मीडियाचा वापर करताना आपण नकळत अनेक खाजगी माहिती उघड करतो, ज्यामुळे आपण स्वतःभोवतीच एक अदृश्य ’सीसीटीव्ही’ लावून घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे. 20 कोटींच्या वर गेलेली सायबर फसवणूक ही धोक्याची घंटा असून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समाजात याबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी बांधवांच्या पारंपारिक ’गदली’ नृत्याने आणि दिंडीने अतिशय उत्साहात झाली. डॉ. मिलिंद काळे यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त आंतरिक शक्ती जागृत करण्यावर भर दिला. या शिबिरात राज्यातील 19 विद्यापीठांतून 98 विद्यार्थी आणि 15 संघ व्यवस्थापक सहभागी झाले आहेत.




