राज्यसभेसाठी नवनीत राणांचे नाव चर्चेत आघाडीवर

राज्यसभेसाठी तिघांमध्ये चुरस

अमरावती /1 मार्च : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आता राजकीय मैदानात चांगलीच धूळ उडत असून विदर्भातील तीन बड्या नेत्यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपने आपल्या कोट्यातील उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली असून यामध्ये प्रामुख्याने अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा, चंद्रपूरचे हंसराज अहीर आणि गडचिरोलीचे अशोक नेते या तिघांच्या नावाचा समावेश आहे. आता या तिघांपैकी नेमकी कोणाची वर्णी लागते आणि कोण विजयाचा गुलाल उधळते याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.
राज्यातून राज्यसभेवर सात खासदार पाठवले जाणार असून सोळा मार्चला त्यासाठी मतदान होणार आहे. भाजपकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता त्यांचे तीन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. पक्षाने पंचवीस जणांची प्राथमिक यादी केंद्रीय समितीकडे सोपवली असून उद्या सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. विदर्भातील या तिन्ही इच्छुकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी केली असून पक्षाने आपला विचार करावा अशी गळ घातली आहे. चंद्रपूरचे हंसराज अहीर हे जुने जाणते नेते असून केंद्रात त्यांनी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मागील निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र नंतर ओबीसी आयोगाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते. आता त्यांचा तो कार्यकाळ संपल्याने ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. दुसरीकडे गडचिरोलीचे अशोक नेते हे देखील आदिवासी पट्ट्यातील महत्त्वाचे नाव आहे. सध्या सरकारचे गडचिरोलीकडे विशेष लक्ष असून तिथे मोठे उद्योग येत आहेत, अशा काळात नेते यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शर्यतीत सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे अमरावतीच्या नवनीत राणा यांची. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्याशी थेट भिडणार्‍या आणि मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाचे धाडस दाखवणार्‍या राणा यांना भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र स्थानिक नेत्यांचा विरोध आणि निवडणुकीतील पराभव यामुळे त्या सध्या पिछाडीवर आहेत. दिल्लीतील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने आणि अमरावतीतील आपली पकड कायम ठेवण्यासाठी त्यांनी आता राज्यसभेचा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. विदर्भातील या तीनही नेत्यांच्या भविष्याचा फैसला आता दिल्लीच्या हाती असून कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल.
नवनीत राणांची प्रतिष्ठा पणाला -अमरावतीमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. भाजपच्या स्थानिक गोटातून त्यांना जरी पूर्ण साथ मिळत नसली, तरी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या त्या जवळच्या मानल्या जातात. त्यामुळेच राज्यसभेच्या माध्यमातून पुन्हा संसदेत जाण्यासाठी त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली असून त्यांच्या नावाची मोठी हवा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button