जेलमधून सुटताच पाच गुन्हेगार पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
गाडगेनगर आणि सिटी कोतवाली पोलिसांची मोहीम

अमरावती /10 फेब्रुवारी : शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमरावती पोलिसांनी कंबर कसली असून, कारागृहातून बाहेर येणार्या गुन्हेगारांवर कडक नजर ठेवली जात आहे. मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी जेलमधून सुटका झालेल्या सहा आरोपींपैकी पाच जणांवर पोलिसांनी तत्काळ प्रतिबंधात्मक गुन्हे दाखल करून त्यांना पुन्हा कायद्याच्या चौकटीत ओढले आहे. गाडगेनगर आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रतिबंधात्मक कारवायांचा वेग वाढवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रेयस हरिलाल पटेल (19, रा. तपोवन नेताजी नगर), डीकेश शानी भोसले (35), नज्जेश नज्या भोसले (20), तुषार आदेश पवार (24) आणि सुरेंद्र सुरेश पवार (24, सर्व रा. राजुरा बेडा) या पाच आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी गंभीर गुन्ह्याखाली जेलमध्ये होते. त्यांच्यासोबतच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत रामा राजू बत्तीसे (21, रा. कुंभारवाडा, फ्रेजरपुरा) याच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांनी फेब्रुवारी 2025 च्या तुलनेत यावर्षी प्रतिबंधात्मक कारवायांमध्ये मोठी वाढ केली आहे. गाडगेनगर पोलिसांनी सर्वाधिक 24 कारवाया केल्या असून, राजापेठ, नागपुरी गेट आणि फ्रेजरपुरा पोलीसही गुन्हेगारांना चाप लावण्यात आघाडीवर आहेत. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.




