ग्रंथांच्या अध्ययनातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा
साहित्यिक विठ्ठल कुलट यांचे प्रतिपादन, मोर्शीत जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

अमरावती/4 ऑक्टोबर : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचा उत्साहपूर्ण प्रारंभ झाला असून, अंधश्रद्धा व काल्पनिक प्रभावातून बाहेर पडण्यासाठी बहुजन समाजाने संत आणि समाजसुधारकांच्या वास्तववादी ग्रंथांचे अध्ययन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल कुलकणी यांनी केले आहे.
उच्च व शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मोर्शी येथील पंजाब बाबा सभागृहात या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना त्यांनी अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, शेतकर्यांचे सुख-दुःख तसेच कौटुंबिक नातेसंबंध यावर काव्यगाण्यातून भाष्य करत समाजात चिकित्सक वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. प्रसिद्ध कवी विजय सांगोळे यांनी महात्मा फुले यांच्या ग्रंथातील शेतकरीविषयक कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. ग्रंथोत्सवाच्या पूर्वार्धात तहसीलदार विनोद वानखेडे यांच्या हस्ते ग्रंथादिंडीचे पूजन करण्यात आले, तर त्यानंतर ग्रंथप्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन पार पडले. दुपारच्या सत्रात प्राध्यापक जगदिश पाटील यांनी भारताचा रक्ततरंज इतिहास या विषयावर ऐतिहासिक प्रसंगांचे दाखले देत उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर कवी धीरज चावदो यांनी हास्य कवितांचा विनोदी कार्यक्रम सादर करून वातावरण आनंदी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राजेश देवकर यांनी केले, संचालन श्रीकांत तिहोकर यांनी तर आभार प्रदर्शन कैलास गव्हाळे यांनी पार पाडले. या सोहळ्यात विद्यापीठरंग अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, अमरावती ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चंद्रकांत चांडोळे आणि ग्रंथ मित्र राजेश डांगोडे यांनी ग्रंथांच्या विषयावर आपले मौलिक विचार मांडले. प्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून, यात गजानन देशमुख, विशाल मोहोड, किशोर जरांडे, अलका तांबळकर, संदीप देशमुख, प्रणाली देशमुख आणि विशाल कणेकर हे कवी आपल्या कविता सादर करणार आहेत.





