राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार सोहळा शेतकर्यांसाठी प्रेरणादायी
कृषी विज्ञान केंद्राविषयी महिला शेतकर्यांची कृतज्ञता

धारणी येथील महिला शेतकर्यांचा सन्मान
अमरावती/27 मे: राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त धारणी येथून आलेल्या महिला शेतकर्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र, घाटखेड येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकर्यांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करत आधुनिक शेतीविषयक माहिती देण्यात आली.
त्यानंतर राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स वेल्फेअर सोसायटी, अमरावतीचे सचिव तथा कृषी विज्ञान केंद्र, घाटखेडच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य मा. अभय एन. देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे, कृषी विज्ञान केंद्र, घाटखेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अतुल कळसकर तसेच राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानच्या सदस्या पौर्णिमा ताई सवाई उपस्थित होत्या. याशिवाय डॉ. दिलीप काळे, प्रफुल राऊत (माजी सभापती), अविनाश पांडे, दत्तात्रय किटूकले, राहुल तायडे, अनुल्ला खान, सुनील सावळे आदी मान्यवरांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक प्रकाश साबळे यांनी केले. उद्घाटक मार्गदर्शन राहुल सातपुते यांनी केले तर पौर्णिमा ताई सवाई आणि डॉ. अतुल कळसकर यांनी शेतकरी मार्गदर्शन करत कृषी क्षेत्रातील नव्या संधींवर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. कळसकर यांनी मा. वसुधाताई देशमुख यांचा कार्यक्रमासाठीचा संदेश उपस्थित शेतकर्यांना वाचून दाखविला. राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात सौ. अरुणा दिनेश बनसोड, सौ. जिजीबाई छोटेलाल गावसकर, राहुल घोगरे, प्रदीप वानखेडे तसेच सौ. सीमा देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे अमर तायडे यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी, महिला बचत गट सदस्य तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




