अमरावतीत पोलिसांनी तोडले ड्रग्जचे कंबरडे

आ. रवी राणांकडून पोलिसांचे कौतुक

* गृहमंत्री फडणवीस यांचे मानले आभार

अमरावती / 24 मार्च -गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती शहराला विळखा घालणार्‍या ’एमडी’ ड्रग्जच्या काळ्या धंद्यावर पोलिसांनी जोरदार प्रहार केला असून, या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत धाडसी पाऊल उचलत अमली पदार्थांच्या अड्ड्यांवर नांग्या ठेचल्या आहेत. या धडाकेबाज कामगिरीचे पडसाद आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधि वेशनात उमटले. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी विधानसभेत अमरावती पोलिसांच्या या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. शहरात पसरलेले हे नशेचे जाळे तरुणाईला उद्ध्वस्त करत असून, त्याविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. तसेच, या गंभीर विषयाकडे वैयक्तिक लक्ष देऊन पोलिसांना कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. शहरातील अनेक निवासी वस्त्यांमध्ये नशेच्या विळख्याने पाय पसरले होते, ज्याची माहिती आमदार राणा यांनी गृहमंत्र्यांना दिली होती. त्यानंतर सुरू झालेल्या या मोहिमेत गुन्हे शाखेने एकामागून एक धडाकेबाज कारवाया करून तस्करांची साखळी तोडून टाकली आहे. या नशेचा मुख्य पुरवठा मुंबईतील डोंगरी परिसरातून विदर्भात होत असल्याचा गंभीर मुद्दाही राणा यांनी यावेळी मांडला. अमली पदार्थांची ही मुळे कायमची उखडून टाकण्यासाठी मुख्य केंद्रांवरच प्रहार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
मुंबईतील ’डोंगरी’ कनेक्शनवर प्रहार करा-अमरावतीत येणारी नशेची खेप मुंबईतील डोंगरी भागातून येत असल्याचे समोर आले आहे. केवळ स्थानिक विक्रेत्यांवरच नव्हे, तर या नशेच्या मुख्य अड्ड्यांवर आणि सूत्रधारांवर कठोर कारवाई करून हा विषारी विळखा समूळ नष्ट करावा, अशी आग्रही मागणी आमदार रवी राणा यांनी सभागृहात केली.

संबंधित बातम्या

Back to top button