551 ग्रामपंचायतींवर प्रशासकांचे राज्य कायम
निवडणुका रखडल्याने गावकारभार अधिकार्यांच्या हाती

एकाच अधिकार्याकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी
अमरावती /18 नोव्हेंबर- जिल्ह्यातील 551 ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपल्याने सध्या या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र, निवडणुका लांबल्यामुळे गावपातळीवरील कारभारावर परिणाम होत असून ग्रामीण नागरिकांच्या अडचणी वाढत आहेत. एका प्रशासकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी असल्याने पाणीपुरवठा, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, पथदिवे आणि नाल्यांच्या समस्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लवकर घेण्याची मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे.
ग्रामपंचायत ही गावाच्या विकासातील महत्त्वाची यंत्रणा आहे. गावातील दैनंदिन प्रश्न सोडविण्यासाठी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर निर्णयप्रक्रिया अधिकार्यांच्या माध्यमातून सुरू आहे. एकाच अधिकार्याला अनेक गावांचा कारभार सांभाळावा लागत असल्याने प्रत्येक गावातील समस्यांचा पाठपुरावा करणे कठीण जात आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती सारखी नाही. काही गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना अनेक गावांमध्ये परिस्थिती सामान्य आहे. त्यामुळे निवडणुकांचे वेळापत्रक ठरविताना स्थानिक परिस्थितीचा विचार करण्याची मागणी होत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था तसेच रोजगार हमी योजनेतील कामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची गरज भासत आहे. निवडून आलेले प्रतिनिधी नसल्याने गावकर्यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याऐवजी लवकर घेऊन गावांचा कारभार पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती द्यावा, अशी मागणी ग्रामीण नागरिकांकडून होत आहे. तालुकानिहाय विचार करता अमरावती 46, भातकुली 36, नांदगाव खंडेश्वर 51, चांदूर रेल्वे 29, वरूड 41, चांदूर बाजार 41, धामणगाव रेल्वे 55, तिवसा 29, मोर्शी 43, अचलपूर 39, दर्यापूर 49, चिखलदरा 23 आणि धारणी 35 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.





