अकोला महापालिकेत मोठी उलथापालथ!

4 नगरसेवक फुटले, गटनेता बदलला

ठाकरेंच्या पक्षाला लावला सुरुंग

अकोला/24 मार्च – अकोला महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार पाडत शिंदे गटाने मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे महापालिकेतील सत्तेची आणि वर्चस्वाची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या पक्षांतरामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, शिंदे गटाने मात्र आपले पारडे जड झाल्याचा दावा केला आहे. या राजकीय घडामोडींनंतर गटनेतेपदाचा पेच निर्माण झाला होता. शिंदे गटात सामील झालेल्या नगरसेवकांनी आपली ताकद दाखवण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बहुमताच्या जोरावर आक्रमक पाऊल उचलत, आतापर्यंत गटनेतेपद भूषवणारे विजय इंगळे यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागी सागर भारुका यांची नवीन गटनेते म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती शिंदे गटाचे पदाधिकारी मंगेश काळे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात आता शिंदे गटाचा वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्याच सहकार्‍यांनी बंडखोरी केल्याने ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला आहे. गटनेते विजय इंगळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत थेट अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. शिंदे गटात गेलेले नगरसेवक सागर भारुका, मनोज पाटील, सुरेखा काळे आणि सोनाली सरोदे यांनी मूळ पक्ष सोडून बेकायदेशीरपणे दुसर्‍या गटात विलीनीकरण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या 4 ही नगरसेवकांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button