नगरसेवकांचा निधी आता तीस लाखांवर!

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विकासाची मोठी झेप

* अविनाश मार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन बैठक
* शहराच्या कानाकोपर्‍यात होणार कामांचा धडाका

अमरावती / 24 मार्च – महानगर पालिकेच्या तिजोरीची चावी आता विकासाच्या मार्गावर फिरली असून, शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्थायी समितीने कंबर कसली आहे. सभापती अविनाश मार्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीत भरघोस वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने प्रस्तावित केलेला 10 लाखांचा निधी थेट 30 लाखांवर नेल्याने आता प्रत्येक प्रभागात 1 कोटी 20 लाखांची विकासकामे मार्गी लागणार आहेत. 843 कोटी 74 लाखांच्या या अर्थ संकल्पातून सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देतानाच, रखडलेले प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यावर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. अमरावती महानगर पालिकेचे सन 2026-27 या वर्षाचे अर्थसंकल्पीय प्रारूप 18 मार्च रोजी आयुक्त सौम्या शर्मा चांदक यांनी स्थायी समितीला सादर केले होते. यावर सखोल चर्चा करण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून बैठकीचे सत्र सुरू झाले. सुरुवातीला प्रशासनाने प्रत्येक नगरसेवकासाठी 10 लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली होती. मात्र, सभापती अविनाश मार्डीकर यांनी शहराचा विस्तार आणि गरजा लक्षात घेता हा निधी 50 लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी लावून धरली. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर आणि सर्व 16 सदस्यांच्या संमतीने हा निधी प्रति नगरसेवक 30 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 92 नगरसेवकांना आपापल्या वॉर्डातील नागरी समस्या सोडवण्यासाठी मोठी ताकद मिळाली आहे. या अर्थसंकल्पात महानगरपालिकेला महसुली उत्पन्नातून 437 कोटी, तर गुंतवणुकीतून 406 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. एकूण 843 कोटी 74 लाख 16 हजार 3 रुपयांच्या या बजेटमध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. सभापती मार्डीकर यांनी स्पष्ट केले की, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो अमरावतीच्या विकासाचे खरे प्रतिबिंब असेल. शहरातील प्रत्येक प्रभाग सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांना तत्पर सेवा देण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. स्थायी समितीने सुचवलेल्या बदलांसह हा अर्थसंकल्प आता 27 मार्च रोजी होणार्‍या आमसभेत अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
विकासाचा नवा ’अमरावती पॅटर्न’-प्रशासनाने आखलेल्या आराखड्यात स्थायी समितीने लोकहितार्थ मोठे बदल केले आहेत. प्रभागनिहाय निधी वाढल्याने आता गल्लीबोळातील कामे रखडणार नाहीत. शहराचा चेहरामोहरा बदलणारा आणि सर्वसामान्यांच्या हिताचा हा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प ठरेल, असा विश्वास सभापती अविनाश मार्डीकर यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button