युवा पिढीला समजून घेत सामाजिक बदलाची पत्रकारिता करा

संपादक श्रीमंत माने यांचे प्रतिपादन

आयआयएमसीत राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्य विशेष व्याख्यान

अमरावती /18 नोव्हेंबर: अमरावती : आजची तरुण पिढी प्रचंड उत्साही असून तिची विचार करण्याची पद्धत आणि कामाची ऊर्जा पूर्णपणे वेगळी आहे. ही पिढी समाजमाध्यमांच्या जगात रमणारी असली तरी आपल्या हक्कासाठी झगडणारी आहे.
त्यामुळे समाजप्रबोधनाची पत्रकारिता करताना तरुणाईचा हा कल समजून घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन दैनिक लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांनी केले. अमरावती येथील भारतीय जनसंचार संस्थेत राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.प्रत्यक्ष भेटीगाठींमुळे माणसांमध्ये आपुलकी निर्माण होते आणि त्यातूनच सामाजिक भान जागे होते असे श्रीमंत माने यांनी स्पष्ट केले. भ्रमणध्वनीच्या अतिवापरामुळे माणसांमधील थेट संवाद कमी होऊन नात्यांमध्ये यांत्रिकता आली आहे. पत्रकारितेतही केवळ भ्रमणध्वनीवरून माहिती मिळवण्यावर भर दिल्यास सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न दुर्लक्षित राहतात. त्यामुळे पत्रकारांनी थेट लोकांमध्ये जाऊन सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन त्यांनी केले. भारतीय प्रेस परिषदेचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती जे. आर. मुधोळकर हे अमरावतीचे सुपुत्र असल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही त्यांनी यावेळी केला. संस्थेचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा यांनी अध्यक्षीय भाषणात बदलत्या काळानुसार नव्या तंत्रज्ञानाची कास धरण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद निताळे यांनी केले तर रोहन तायडे व्यासपीठावर उपस्थित होते. नागेश मगरे यांनी सूत्रसंचालन केले आणि हिमांशु राय यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश कुमार निशांत अंभोरे राजेश झोलेकर नूरुज्जमा शेख भूषण मोहोकार अनंत नांदुरकर नंदा तुप्पट आणि राहुल पाटमासे यांनी परिश्रम घेतले.

Back to top button