विदर्भात काँग्रेसला बळ देण्यासाठी पक्षबांधणीला वेग
अमरावतीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून आढावा

गावागावात विचार पोहोचविण्याचे कार्यकर्त्यांना ठोस आदेश
अमरावती /18 नोव्हेंबर- आगामी काळातील राजकीय आव्हाने लक्षात घेता काँग्रेसचे संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हालचालींना वेग दिला असून बुधवारी अमरावतीत पाच जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
येथील काँग्रेस भवनात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. श्रीवेल्ला प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागातील लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी, शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांच्याशी सविस्तर चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाची सद्यस्थिती तपासण्यात आली.
मंडळ, बुथ आणि तालुकास्तरावरील संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांचा सहभाग तसेच पक्षाच्या आगामी कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा सपकाळ यांनी घेतला. केवळ जिल्हास्तरापुरते काम मर्यादित न ठेवता गावपातळीपर्यंत पक्षाची विचारधारा आणि कार्यक्रम पोहोचवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या बैठकीला अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, अभिजित सपकाळ, माजी आ. वीरेंद्र जगताप, माजी आ. राहुल बोंद्रें, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी महापौर विलासराव इंगोले, जिया पटेल यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यावर अधिक भर
मंडळ आणि तालुकास्तरावर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांनी पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. केवळ पदे न भूषवता संघटनात्मक जबाबदार्या प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची फळी सक्रिय करून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा कानमंत्र यावेळी नेत्यांना देण्यात आला.





