बडनेरात युवकाची हत्या; एक गंभीर

दारूच्या दुकानाबाहेर जुन्या वादातून टोळक्याचा हल्ला

आठवडी बाजारात थरारक घटना

बडनेरा पोलीस आरोपीच्या शोधात

अमरावती /30 ऑगस्ट – बडनेरा येथील गर्दीने गजबजलेल्या आठवडी बाजार परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास जुन्या वादातून दोन गटांत तुफान आणि थरारक खूनी संघर्ष झाला. शिवाजी चौकातील दारूच्या दुकानाबाहेर झालेल्या या वादाचे रूपांतर काही वेळातच भयंकर हिंसाचारात झाले. 5 ते 6 जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून दोन युवकांवर धारदार शस्त्रांनी अंधाधुंद जीवघेणा हल्ला केला. या रक्तरंजित हल्ल्यात गुलिस्ता नगर येथील रहिवासी शेख कासिम या युवकाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर सोहेब शाह सरदार शाह हा युवक गंभीर जखमी झाला आहे. भरबाजारात घडलेल्या या घटनेमुळे पळापळ झाली असून संपूर्ण परिसरात भीती आणि तणावाचे सावट पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी चौकातील दारू भट्टीच्या परिसरात दोन्ही गटांतील युवक आमनेसामने आले. जुन्या भांडणाची आग मनात ठेवून आरोपींनी अचानक शेख कासिम आणि सोहेब शाह सरदार शाह यांच्यावर शस्त्रांनी वार करण्यास सुरुवात केली. आरोपींनी कुठलाही विचारन करता दोघांच्या शरीरावर सपासप वार केले. हल्लेखोरांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असतानाच शेख कासिम गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला, तर सोहेब शाह सरदार शाह याच्यावरही आरोपींनी वार केले. घटनेनंतर दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र शेख कासिम याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. गंभीर दुखापती झालेल्या सोहेब शाह सरदार शाह याच्यावर रेडियम रुग्णालयात अतिदक्षता विभागात तातडीने उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे.
घटनेची बातमी वार्‍यासारखी पसरताच बडनेरा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून गर्दी पांगवली आणि तणावपूर्ण परिस्थितीवर कडक नियंत्रण मिळवले. यानंतर पोलिसांनी तातडीने शिवाजी चौक आणि आठवडी बाजारातील विविध दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज खंगाळणे सुरू केले. फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा माग काढत अवघ्या काही तासांत एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य आरोपींसह इतर पसार आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असून, फरार आरोपींनाही लवकरच बेड्या ठोकू, असा दावा पोलिसांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button