मेळघाटची राखी सातासमुद्रापार
अमेरिकेपासून जपानपर्यंत पोहोचली आदिवासी बांधवांची बांबूची कलाकुसर

150 हातांना रोजगार, 70 आदिवासी महिलांना मिळाली नवी उमेद
चिखलदरा/28 ऑगस्ट : मेळघाटच्या जंगलातील बांबूला आदिवासी हातांची कलाकुसर लाभली आणि त्यातून तयार झालेली पर्यावरणपूरक राखी आता थेट जगभर पोहोचली आहे. अमेरिका, जर्मनी, आयर्लंड आणि जपानसह भारतातील प्रमुख शहरांमध्ये मेळघाटच्या या अनोख्या राखीने यंदा आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने मेळघाटच्या आदिवासी हस्तकलेचा ठसा आता देशाच्या सीमा ओलांडून परदेशातील मनगटांवर उमटणार आहे.
बांबूपासून तयार केलेल्या या राख्या केवळ आकर्षक आणि पर्यावरणपूरक नाहीत, तर त्या आदिवासी समाजाच्या स्वावलंबनाची आणि महिला सक्षमीकरणाची कहाणी सांगत आहेत. धारणी तालुक्यातील लवादा, चिखली, घोटा आणि कोठा या चार गावांमध्ये या राखी निर्मितीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
या उपक्रमामुळे चार गावांतील सुमारे 150 जणांना नियमित रोजगार मिळाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये 70 आदिवासी महिलांचा समावेश आहे. घरगुती जबाबदार्या सांभाळत महिलांना आपल्या गावातच रोजगाराची संधी मिळत असल्याने त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळाली आहे.
पारंपरिक कौशल्याला आधुनिक बाजारपेठेची जोड मिळाल्याने आदिवासी समाजातील हस्तकलेलानवी दिशा मिळत आहे. जंगलातून उपलब्ध होणार्या बांबूचा उपयोग करून तयार होणार्या या राख्या रोजगारनिर्मितीबरोबरच स्थानिक कौशल्याचे संवर्धनही करत आहेत.
मेळघाटच्या आदिवासी बांधव-भगिनींच्या हातांनी तयार केलेल्या राख्यांना यंदा परदेशातूनही मागणी मिळाली आहे. अमेरिका, जर्मनी, आयर्लंड आणि जपान या देशांमध्ये या राख्या पोहोचल्या आहेत. भारतातील विविध प्रमुख शहरांमध्येही या राख्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.एका छोट्याशा आदिवासी गावात तयार झालेली राखी हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशातील मनगटावर पोहोचत असल्याने हा उपक्रम मेळघाटच्या दृष्टीने अभिमानाचा ठरला आहे. या उपक्रमाला शैक्षणिक क्षेत्रातूनही प्रतिसाद मिळत आहे. पुणे आणि नागपूरमधील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी बांबूच्या राख्या बनविण्याचे ऊखध किट्स खरेदी केले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ तयार राखी देण्याऐवजी ती स्वतः तयार करण्याचा अनुभव मिळावा, हा यामागील उद्देश आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये हस्तकलेबरोबरच पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्लास्टिक, कृत्रिम साहित्य आणि रासायनिक घटकांपासून दूर जात बांबूसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून या राख्या तयार केल्या जात आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे कामही या उपक्रमातून होत आहे.
संस्थांचे मार्गदर्शन, महामंडळाचे सहकार्य
हा अभिनव उपक्रम वेणू शिल्पी औद्योगिक सहकारी संस्था आणि संपूर्ण बांबू केंद्र, लवादा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आदिवासी विभागाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचेही या उपक्रमाला सहकार्य लाभत आहे.या संस्थांच्या मार्गदर्शनामुळे स्थानिक पातळीवरील कौशल्याला बाजारपेठेशी जोड मिळाली असून, आदिवासी हस्तकलेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.





