खासदारच करतायत सहा दिवसांपासून आंदोलन

रोहित पवारांनीही घेतली भेट

वर्धा/15 सप्टेंबर  : राज्यात सध्या आंदोलनाच्या माध्यमातून विविध विषयांना वाचा फोडण्यात येत आहे. सरकार, प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी जनता आंदोलनाचा वापर करत आहे. पण केवळ लोकच नाही तर खासदारही आता याच आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
कारण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे हे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाला बसलेल्या काळेंची पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मंगळवारी (15 सप्टेंबर) भेट घेतली. मात्र, काळे करत असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून अजूनही तोडगा न निघाल्याने आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रायपूर जंगली या गावात 9 सप्टेंबरला भगवान चंद्रभान धुर्वे या शेतकर्‍याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सायंकाळी ही घटना उजेडात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यास गावात पाठविण्यात आले अंत्य संस्कारासाठी मदत म्हणून शासनाचे 25 हजार रुपये पीडित कुटुंबाने स्वीकारले. मात्र नंतर पीडित कुटुंबातील एकास नोकरी व 1 कोटी रुपये नुकसान भरपाई अशी मागणी गावाकर्‍यांनी रेटून धरली. परंतु, अद्यापही शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने पीडित कुटुंबियांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Back to top button