तीन नवजात बालकांच्या मृत्यूने आरोग्यमंत्री भाऊक
डफरीन रुग्णालयातील अग्नितांडवाच्या घटनेने समाजमन सुन्न

मृतकाच्या नातेवाईकांशी संवाद, निष्पक्ष तपासणीची ग्वाही
दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-प्रहारची मागणी
पीडीतांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई देण्यावर वेधले लक्ष
अमरावती /24 ऑगस्ट: जिल्हा महिला रुग्णालय (डफरीन) येथील एनआयसीयूमध्ये सोमवारी पहाटे सुमारे 3.30 वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू, तर सहा बालके गंभीर जखमी झाल्याच्या घटनेने संपूर्ण अमरावती हादरले आहे. निष्पाप बालकांच्या मृत्यूमुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसु, प्रवक्ते जितू दुधाने, महानगरप्रमुख बंटी रामटेके, हॉकर प्रमुख गणेश मारोडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तातडीने डफरीन रुग्णालयात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रहार कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर विविध मागण्या मांडून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी केली. प्रहार कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2022 मध्येही याच रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये अशाच प्रकारची गंभीर घटना घडली होती. त्यावेळीही नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. असे असतानाही संबंधित व्हेंटिलेटर पुरवठा करणार्या कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला नाही किंवा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले नाही. त्यामुळे त्याच कंपनीकडून पुन्हा व्हेंटिलेटरची खरेदी कशी करण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. सुमारे दीड महिन्यापूर्वी रुग्णालयातील मिल्क बँकेतील वॉशिंग मशीनमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती वरिष्ठ अधिकारी अथवा जिल्हाधिकार्यांना का देण्यात आली नाही, एनआयसीयूची अग्निशमन यंत्रणा वेळीच कार्यान्वित का झाली नाही, फायर ऑडिट कोणी केले, आग लागल्यानंतर अलार्म अथवा सायरन का वाजला नाही आणि फायर सिस्टम का सक्रिय झाली नाही, असे गंभीर प्रश्नही निवेदनातून उपस्थित करण्यात आले आहेत. घटनेची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृत नवजातांच्या नातेवाईकांना तातडीने प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी तसेच संबंधित व्हेंटिलेटर कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि जीवनरक्षक उपकरणांची नियमित तपासणी सुनिश्चित करण्याची मागणीही करण्यात आली.
परिजनांची भेट घेऊन भावुक झाले आरोग्यमंत्री
डफरीन रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रहार कार्यकर्त्यांसह तीनही मृत नवजातांच्या नातेवाईकांची भेट घेतली. निष्पाप बालकांना गमावलेल्या कुटुंबीयांची व्यथा ऐकून मंत्री भावुक झाले. त्यांनी नातेवाईकांशी सविस्तर चर्चा करून या दुःखद घटनेची निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास दिला. इतक्या गंभीर घटनेत कोणत्याही स्तरावरील हलगर्जीपणा दुर्लक्षित केला जाणार नाही, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी रुग्णालय परिसरातील कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पुन्हा केली. प्रकरणात लवकरात लवकर ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार कार्यकर्त्यांनी दिला. तीन निष्पाप बालकांचा मृत्यू केवळ दुर्घटना म्हणून दुर्लक्षित न करता, या घटनेमागील निष्काळजीपणाच्या मुळापर्यंत जाऊन जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.




