दिल्ली संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकार्याचा संशयास्पद मृत्यू

नवी दिल्ली /23 ऑगस्ट ; दिल्लीत तीन महिन्यांच्या गरोदर महिलेने सासरच्या लोकांच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला संरक्षण मंत्रालयात कार्यरत होती. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्यांनी तिच्या पतीसह सासरच्या इतर मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून चौकशी सुरू केली आहे.
महिलेचा पती आणि सासरचे लोक तिला सातत्याने मानसिक अन् शारीरिक त्रास देत होते. ही महिला फोनवरून माहेरच्यांशी बोलताना सासरी होणार्या या त्रासाबाबत सांगत असे. ती सतत मानसिक तणावाखाली होती आणि आपल्या परिस्थितीची माहितीकुटुंबाला देत होती, असं तिच्या माहेरच्यांनी म्हटलं आहे.नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी त्यांना फोनद्वारे मुलीच्या आत्महत्येची माहिती मिळाली. हे समजताच माहेरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून सासरच्यांनीच तिची हत्या केली आहे, असा थेट आरोप माहेरच्यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




