गांधीवाद आध्यात्मिक मानवतावाद

डॉ. सतीश तराळ यांचे प्रतिपादन

अमरावती/4 ऑक्टोबर  : अमरावतीत महात्मा गांधी जयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला. श्री गुरुदेव सेवालीम ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात डॉ. सतीश वमी यांनी अध्यक्षीय भाषणात गांधीजींचे विचार आणि त्यांचे जागतिक महत्त्व उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळसाहेब महल्ले, रामकृष्णा धांदवर, गजानन पाथरो, नीलिमा भोजने आणि छाया पाथरो यांनी गांधीजींच्या विचारांवर आधारित गोड भजने सादर केली, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात गांधीविचारांची नवीन ऊर्जा निर्माण झाली. यावेळी बोलताना डॉ. सतीश वमी यांनी स्पष्ट केले की, महात्मा गांधी हे विश्वातील थोर व्यक्तीमत्त्व असून त्यांचा आचार हाच खरा गांधीवाद आहे. शस्त्राशिवाय अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा उभा करणारे गांधीजी जागतिक इतिहासात अद्वितीय ठरले आहेत. ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या मानवतावादी परंपरेच्या मालिकेत गांधीजींचे विचार जगाला दिशा देणारे ठरले असून एकादशव्रत, असहकार, सर्वोदय आणि सत्याग्रह या त्यांच्या अमूल्य देणगी आहेत.या कार्यक्रमात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या विचारांवर उपस्थितांनी सखोल मंथन केले. समाजापुढील विविध प्रश्नांवर गांभीर्याने विचार करून विवेकवादी आणि मानवतावादी समाज निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. दिलीप काळोळे, पुरुषोत्तमराव गाडगे, प्राचार्य दिलीपसिंह खांबारे, डॉ. भोजराज चौधरी, डॉ. शोभना गायकवाड, डॉ. मंदा नांदूरकर, डॉ. नीता कचवे, प्रफुल्ल मंद श्रीधर, प्रा. नेहा भटकळ, प्राचार्य दादाभाऊ दाभाडे, अनिल पांचोळे, प्रा. नरेंद्र राऊत आणि डॉ. श्रीधरराव जावकर यांनी आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले. तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल डॉ. रानी नागपुरे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक डॉ. मंदा नांदूरकर यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.

Back to top button