पावसाच्या लांबणीने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त
शेतकर्यांनी बाळगावा संयम दुबार पेरणी टाळण्यासाठी आ.रवी राणा यांचे आवाहन

अमरावती/15 जून– जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे. ही परिस्थिती पाहून बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी सोमवारी थेट आपल्या शेताची वाट धरली. त्यांनी स्वतः ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेताची नांगरणी करत मशागतीची कामे पूर्ण केली.
पाऊस लांबल्याने पेरणीचा मुहूर्त हुकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बळीराजाचे दुःख जवळून अनुभवत असतानाच त्यांनी शेतकर्यांना खडे बोल सुनावले. पावसाची प्रतीक्षा असताना घाईने पेरणी करणे जीवावर बेतू शकते, असा इशारा त्यांनी दिला. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाशिवाय आणि पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे. पावसाअभावी पेरणी केली आणि पुढील वीस दिवस पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. खते आणि बियाण्यांचा खर्च वाढलेला असताना पुन्हा आर्थिक झळ सोसणे शेतकर्यांच्या हिताचे नाही. त्यामुळे प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकर्यांनी संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात असला तरीही धीर धरून कृषी विभागाच्या सूचनेची प्रतीक्षा करणे सध्या काळाची गरज आहे. लवकरच पाऊस पडून खरीप हंगाम सुगीचा व्हावा, हीच प्रार्थना रवी राणा यांनी केली आहे.




