प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष; आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर
शासनाच्या डोळेझाकवर खंत

अमरावती /16 जून : मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवा प्रवेश नियमांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यभरातील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांतील कर्मचार्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.संघटनेने यापूर्वी दि. 2 जून रोजी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये दोन तासांचे धरणे व निदर्शने आंदोलन करून शासन आणि दि. 9 ला एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारलेला होता.
या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या आंदोलनानंतरही मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही अथवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.त्यामुळे पूर्वनियोजित आंदोलनाच्या पुढील टप्प्यानुसार आज दि. 16 जून रोजी राज्यभरातील कर्मचार्यांनी बेमुदत संपात सहभाग नोंदविला. शासनाने अद्यापही या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांतील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर, राज्य संघटक संदीप खवले तसेच अभिजीत गावंडे, अक्षय राठोड, अमोल माठोडे, उज्वल ठाकरे, संजय चौधरी, देवानंद खंडारे आणि अन्य पदाधिकारी व कर्मचार्यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या म्हणण्यानुसार, कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर रखडलेल्या असून त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. राज्यातील सर्व कर्मचार्यांनी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा दावाही संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला आहे.




