मेळघाटच्या हरिसाल जंगल सफारीत ‘वाघोबाचे’ दर्शन

सलग दर्शनाने पर्यटक भारावले; मेलघाटच्या पर्यटनाला नवी झेप

चिखलदरा /16 जून: मेलघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल जंगल सफारीमध्ये सध्या ‘वाघोबा’ पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सफारीसाठी येणार्‍या पर्यटकांना सतत वाघाचे दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलातील रस्त्यांवरून ऐटीत चालणारा, पाणवठ्याजवळ विसावलेला आणि आपल्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरणारा वाघ पाहण्याचे भाग्य अनेक पर्यटकांना लाभत असल्याने हरिसाल सफारीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
मेलघाटच्या दाट जंगलात वाघाचे दर्शन होणे हा पर्यटकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव असतो. मात्र, अलीकडील काळात हरिसाल सफारी मार्गावर वाघाच्या नियमित हालचाली दिसून येत असल्याने पर्यटकांना सफारीदरम्यान वाघ पाहण्याची संधी अधिक प्रमाणात मिळत आहे. परिणामी, राज्यातील विविध भागांसह देशभरातून वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकार आणि पर्यटक मोठ्या संख्येने हरिसालकडे आकर्षित होत आहेत. सफारीदरम्यान वाघाचे दर्शन होताच पर्यटकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. अनेकांनी आपल्या कॅमेर्‍यात वाघाच्या देखण्या हालचाली टिपल्या असून त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामुळे मेलघाट आणि हरिसाल जंगल सफारीची ओळख राष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ होत आहे. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सफारीमध्ये पर्यटकांना वाघाबरोबरच बिबट्या, रानगवा, अस्वल, सांबर, चितळ, रानडुक्कर तसेच विविध दुर्मीळ पक्ष्यांचेही दर्शन होत आहे. समृद्ध जैवविविधता आणि निसर्गसौंदर्यामुळे मेलघाट हे वन्यजीव पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटनाशी संबंधित घटकांच्या मते, वाघाच्या सततच्या दर्शनामुळे हरिसाल परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळत आहे. हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे आणि स्थानिक रोजगाराच्या संधींनाही याचा सकारात्मक परिणाम होत आहे. आगामी पर्यटन हंगामात पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने मात्र पर्यटकांना जंगलातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शांतता राखणे, वाहनातून खाली न उतरणे आणि प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात हस्तक्षेप न करणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. हरिसाल जंगल सफारीतील ‘वाघोबाच्या’ या सलग दर्शनामुळे मेलघाट पुन्हा एकदा चर्चेत आले असून, निसर्ग आणि वन्यजीव पर्यटनप्रेमींसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button