‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य तिरंगा बाईक रॅली
मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

नागरिकांचा देशभक्तीच्या जयघोषात उत्स्फूर्त सहभाग
अमरावती /13 ऑगस्ट- अमरावती महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आणि ’हर घर तिरंगा’ मोहिमेचा भाग म्हणून शहरात देशप्रेमाची उकळी आणणारी भव्य बाइक रॅली गुरुवारी मोठ्या दणक्यात पार पडली. झोन क्रमांक दोन राजापेठ, नागरी आरोग्य केंद्र आयसोलेशन आणि मनपा शाळा क्रमांक वीस यांच्या संयुक्त पुढाकाराने आयोजित या रॅलीने संपूर्ण अमरावतीत राष्ट्रभक्तीचे तुफान उठवले. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला होता.
दसरा मैदानातील नागरी आरोग्य केंद्र आयसोलेशन येथून रॅलीचा शुभारंभ झाला. हातात फडकणारा राष्ट्रध्वज आणि गाड्यांवर तिरंगा लावून अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या उत्साहाने रस्त्यावर उतरले. ही रॅली राजापेठ, राजकमल चौकामार्गे नेहरू मैदानावर पोहोचली. संपूर्ण मार्गावर तिरंग्याची नयनरम्य सजावट आणि देशभक्तीपर जयघोष पाहायला मिळाला. या रॅलीचे समर्थ नेतृत्व झोन क्रमांक दोनचे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर यांनी केले, तर सभापती सौ. स्वाती कुलकर्णी यांनी रॅलीचे अध्यक्षस्थान भूषविले. या उपक्रमासाठी स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी खडसे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र गुल्हाने यांनी विशेष पुढाकार घेतला. रॅलीत क्षेत्रीय अधिकारी नर्मदा चव्हाण, नगरसेवक प्रदीप हिवसे, शाळा क्रमांक वीसचे मुख्याध्यापक वानखडे सर यांच्यासह आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा वर्कर, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नेहरू मैदानावर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.




