जनार्दन बोथे गुरुजींना ‘पद्मश्री’

राष्ट्रसंतांच्या विचारांचा सन्मान, सेवाव्रतीची भारत सरकारकडून दखल

नवी दिल्ली/25 जानेवारी  – प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्रसरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पद्मपुरस्कारात अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस श्री जनार्दनपंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे स्वीय सहाय्यक म्हणुन त्यांच्या कार्याला प्रारंभ झाला. विविध संस्था व सामाजिक कार्यात अग्रगणी असलेले जनार्दन बोथे यांना पद्मश्री जाहीर झाल्याच्या वार्तेने अमरावती जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली असुन श्री गुरुदेव सेवा मंडळातील सेवाधारी कार्यकर्त्यांचा शासनाने केलेला हा सर्वोच्च सन्मान आहे. अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे श्री. प्रभाकरराव वैद्य, अनाथांचे नाथ श्री. शंकरबाबा पापळकर यांच्यानंतर अमरावतीकरांचा केंद्रसरकारने बोथे गुरुजींच्या रुपात मोठा सन्मान केला आहे. बोथे गुरुजींनी गेल्या 5 दशकाहून अधिक काळ समाज उध्दारासाठी वाहीला आहे. शिक्षण, ग्रामिण विकास, आध्यात्म प्रचार आणि मानव सेवा यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. 1942 मध्ये स्थापन झालेल्या अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी यांचे प्रमुख सचिव म्हणुन त्यांनी आध्यात्मिक मुल्यांना समाजातील मुळ पातळीवर परीवर्तनकारी कृतीत रुपांतरीत केले आहे.
1972 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. दलित, आदिवासी, वंचीत घटकाकरीता राष्ट्रसंताच्या नावे सुरु झालेला ज्ञानयज्ञ पुढे विस्तारला. आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये तब्बल 11 निवासी शाळा व वसतीगृहे सुरु करुन हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी आग्रह धरला. बोथे गुरुजी समाजसेवक प्रसिध्द आहेत. तेव्हाच त्यांच्यातील शिस्त, मुल्य व नेतृत्व गुणाचीही चर्चा करण्यात येते. गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वारश्याचे निष्ठावान संवाहक आहेत. त्यांनी राज्यस्तरीय साहीत्य संमेलन आयोजित केली. महाराजांच्या दुर्मिळ व दस्तऐवजाचे संग्रहालय तयार केले. राष्ट्रसंताच्या विचाराचा प्रसार व्हावा यासाठी ग्रामगितेच्या सबसीडी प्रती समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचविल्या. गुरुजींनी आरोग्य उपक्रमही सुरु केले. मोझरीच्या गुरुदेव आयुर्वेदीक रुग्णालयात नेहमीच रक्तदान शिबीरे, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबीर आयोजित केले. अलिकडेच 65 व्या वाढदिवसानिमित्य त्यांनी 65 गावांना आदर्श ग्राम म्हणुन रुपांतरीत केले.
श्री. बोथे गुरुजींनी जवळपास 11 संस्था स्थापन केल्या. 1972 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्था, 1979 ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक आश्रमशाळा, परांडा, जि. अकोला, यासह कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, आदिवासीशाळा, वसतीगृहे यांचे संचालन केले. सत्पुरुषाच्या नावाने सुरु केलेल्या शिक्षण संस्थेचा कारभारही तेवढाच पवित्र आणि निर्मळ राहावा यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. गुरुजींना यापुर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी गृहमंत्री स्व. आर.आर.पाटील यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदिवासीसांठी उत्कृष्ट शैक्षणिक कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.अनेक पुरस्कारांनी विभुषित असलेले श्री.जनार्दन बोथे गुरुजी चालतं बोलतं सेवापीठं आहे. राष्ट्रसंताचे स्वीय सहाय्यक म्हणुन सेवेत आल्यानंतर त्यांनी तुकडोजी महाराजांचे विचार देशभर पोहचविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे 1959 मध्ये ते स्ेटनो आणि टायपीस्ट म्हणुन काम करीत होते. पुढे त्यांनी संगीत आणि फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले आणि 1960 ते 1964 राष्ट्रसंतांसोबत कार्यालयीन कामकाज व खाजगी सचिव म्हणुन त्यांच्या कामाची उत्तम शैली होती. राष्ट्रसंतासोबत च्या जगभरातील प्रवासात बोथे गुरुजी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ऑगष्ट 1968 मध्ये आजारी पडले. त्यांच्या सेवेत बोथे गुरुजी अहोरात्र होते. श्री. जनार्दन बोथे गुरुजींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने एका सच्चा व प्रामाणिक सामाजिक नेतृत्वाचा सरकारने सन्मान केला असे म्हणता येईल.

केंद्र शासनाने जाहीर केलेला पद्मश्री पुरस्कार हा राष्ट्रसंतांच्या चरणी अर्पण करीत असुन अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळात कार्य करणार्‍या सेवाधारकांचा, कार्यकर्त्यांचा, पदाधिकारी आणि महाराजांच्या लाखो भक्तांचा हा सन्मान आहे. अशी भावपुर्ण प्रतिक्रिया श्री. जनार्दन बोथे गुरुजींनी आपली मातृभूमिशी बोलतांना दिली. गुरुजी म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा प्रचार करणे या ध्येयाने मी अविरत काम करीत गेलो व त्याची कुठेतरी दखल घेतली याचा मला आनंद आहे.

संबंधित बातम्या

Back to top button