जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सुरेश निमकर यांचा अपघाती मृत्यू
मंगरूळ दस्तगीरजवळ चारचाकी उलटून अपघात

ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वीच घेतला अखेरचा श्वास
धामणगाव रेल्वे/14 ऑगस्ट – अमरावती जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर यांचा शुक्रवार 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मंगरूळ दस्तगीर गावाजवळ धामणगाव रेल्वे रस्त्यावर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. चारचाकी वाहनाचा अपघात झाल्यानंतर निमकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मंगरूळ दस्तगीरसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश निमकर हे धामणगाव रेल्वे येथून आपल्या मंगरूळ दस्तगीर येथील गावाकडे चारचाकी वाहन क्रमांक एमएच 27 बीई 8379 ने जात होते. गावाजवळ धामणगाव रस्त्यावर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत त्यांना तातडीने धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
सुरेश निमकर यांनी 2018 ते 2022 या काळात अमरावती जिल्हा परिषदेत शिक्षण व बांधकाम सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण तसेच बांधकामाशी संबंधित विविध कामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या अचानक निधनाने परिसरातील नागरिकांसह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.शनिवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता मंगरूळ दस्तगीर येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.




