होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

* ‘महाज्योती’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन
नागपूर /19 ऑक्टोबर – महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, म्हणजेच महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आज प्रत्यक्षात आले आहे. इतर मागासवर्ग विभागाची स्थापना झाल्यामुळे या कामाला गती मिळाली असून, या विभागाच्या माध्यमातून होणारी नवीन पिढी आकारास येईल आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नागपूर येथील जिल्हा नियोजन भवन आवारात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ओबीसी समाजाला पुढे नेण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, ज्यात प्रशिक्षण, स्वयंरोजगार यांचा समावेश आहे. ओबीसी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाज्योतीची निर्मिती केली असून पुरेसा निधी उपलब्ध केला गेला आहे. आज ओबीसी मुलांसाठी 60 पेक्षा जास्त वसतिगृह सुरू आहेत आणि ओबीसी समाजाची नॉन-क्रिमिनल मर्यादा आठ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. हा ऐतिहासिक क्षण असून, नागपूरच्या भूमीवर आता भव्य 7 मजली प्रशासकीय इमारत तयार होणार आहे, जी केवळ वास्तू नव्हे, तर शैक्षणिक प्रगतीचा पाया घालणारी ठरेल, असे त्यांनी प्रतिपादन केले.
महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीत वाचनालय, समुपदेशन कक्ष, प्रशिक्षण कक्ष, भोजन कक्ष आणि 248 विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय यासह सर्व सुविधा असतील. ही वास्तू शिक्षण, संस्कार आणि संशोधनाचा पवित्र संगम राहणार आहे. नाशिक येथे महाज्योती संस्थेचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी 174 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
भव्य 7 मजली इमारत राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रशिक्षण आणि संशोधनासाठी उभारली जात असून, नागपूर सुधार प्रकल्प (एनआयटी) मार्फत तिचे बांधकाम होत आहे. या इमारतीत तळघर क्रमांक 1 व 2 मध्ये मुबलक वाहनतळाची व्यवस्था असेल. तळमजल्यावर 500 लोकांच्या क्षमतेचे ऑडिटोरियम, अभ्यास कक्ष, नियंत्रण कक्ष आणि उपहारगृह असणार आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यांवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था तसेच प्रशासकीय सभागृह असेल. तिसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष व उपहारगृह तर चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यांवर प्रशिक्षण कक्ष आणि बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात व्यासपीठावर महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त व नियोजन राज्य मंत्री डॉ. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके, परिणय फुके, कृष्णा खोपडे, कृपाल तुमाने, विकास ठाकरे, चरणसिंग ठाकूर, आशिष देशमुख, संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे उपस्थित होते. प्रास्ताविक महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी केले.




