आज 59 जातींचा इर्विन चौकातून भव्य महामोर्चा

न्यायमूर्ती अनंत बगर समितीचा अहवाल सार्वजनिक करा

आरक्षण उपवर्गीकरणाला सर्व संघटनांचा तीव्र विरोध
संविधान रक्षणासाठी वंचित समाज एकवटला

अमरावती /16 जून– राज्य सरकारने अनुसूचित जातींमध्ये लादलेल्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात अमरावती जिल्ह्यात 59 वंचित जातींनी एकत्र येत एका भव्य संयुक्त महामोर्चाचे आयोजन केले आहे. शासनाचा हा निर्णय तत्काळ रद्द करून न्यायमूर्ती अनंत बगर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, या मुख्य मागणीसाठी हा एल्गार पुकारण्यात आला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेतून आयोजकांनी दिली. आज बुधवारी सकाळी 11 वाजता इर्विन चौकातून या महामोर्चाची सुरुवात होईल आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. या आंदोलनात 59 जातींमधील हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा विरोधी कृती समितीचे प्रा. जगदीश गोवर्धन यांनी केला आहे. सरकारी नोकर्‍यांमधील मागासवर्गीयांचा अनुशेष तातडीने भरून काढावा, पदोन्नतीत आरक्षण लागू करावे, जातीनिहाय जनगणना करावी आणि एससी, एसटी, ओबीसींसाठीची क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करावी, अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला रमेश कटके, रविकांत गवई, नयन मोंढे, विजयकुमार चौरपगार, मदन गायकवाड, रितेश तेलमोरे, अश्विन गोंडाणे, राजेश वानखडे, सुदाम बोरकर आणि प्रवीण मेश्राम उपस्थित होते. या महामोर्चाला भारतीय बौद्ध महासभेसह विदर्भातील अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. संविधान आणि आरक्षण संरक्षणाचा संकल्प करत राजकीय, सामाजिक, कर्मचारी, युवक, महिला संघटना आणि बुद्ध विहारांचे प्रतिनिधी यात सामील होत आहेत. तसेच, 20 जून रोजी नागपूरच्या दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत दुपारी 3 वाजता विदर्भस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व मागासवर्गीय बांधवांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button