तडीपार गुंडाला गावठी कट्ट्यासह अटक

गुन्हे शाखेची फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई

दोन जिवंत काडतुसांसह आरोपी जेरबंद

अमरावती /16 जून- शहर गुन्हे शाखेने बेकायदेशीर हत्यारांविरुद्ध विशेष मोहीम राबवून एका युवकाला देशी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 37 हजार रुपये किमतीचे हत्यार जप्त केले असून, हत्यार पुरवणारा दुसरा आरोपी फरार आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव गुलिस्तान नगर येथील अहसान खान हसन खान (25) असे आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार शहरात बेकायदेशीर हत्यारे बाळगणार्‍यांविरुद्ध मोहीम सुरू आहे. यादरम्यान गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, एक युवक हत्यारासह आशियाना क्लबकडे येत आहे. पथकाने तेथे सापळा रचून अहसान खान याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता कमरेला एक देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. चौकशीत त्याने हे हत्यार अमरावतीचा रहिवासी रेहान खान अयुब खान उर्फ रेहान बंदूक याने दिल्याचे सांगितले. रेहान खान सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक आरोपीला आधी अमरावती शहर व ग्रामीण भागातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते, तरीही तो शहरात हत्यारासह फिरत होता. पोलिसांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात आर्म्स क्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, रमेश धुमाळ व सहाय्यक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेने केली.

संबंधित बातम्या

Back to top button