‘लक्ष्मी गॅस एजन्सी’ला कुलूप; मालकाने ठोकली धूम

संतप्त ग्राहकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

अमरावती / 25 मार्च : जिल्हा पुरवठा विभागाने शहरात गॅसची कोणतीही टंचाई नसल्याचा मोठा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात मात्र 24 तासांतच या दाव्याची हवा निघाली आहे. रुक्मिणी नगर भागातील ‘लक्ष्मी गॅस एजन्सी’च्या चालकाने चक्क कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढल्याने शुक्रवारी ग्राहकांचा संयम सुटला. संतप्त झालेल्या शेकडो ग्राहकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनाला जाब विचारला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील गॅस वितरणात सध्या मोठा सावळागोंधळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबादेवी परिसरातील गॅस एजन्सीकडून ग्राहकांच्या भ्रमणध्वनीवर सिलिंडर वितरित झाल्याचे बनावट संदेश पाठवले जात आहेत. सचिन अग्रवाल या ग्राहकाने संताप व्यक्त करताना सांगितले की, त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सिलिंडर घेतलेच नाही, तरीही त्यांच्या क्रमांकावर दोनदा गॅस मिळाल्याचे संदेश धडकले. या प्रकाराची विचारणा करण्यासाठी ते एजन्सीवर गेले असता, त्यांचा क्रमांकच तेथे अवरुद्ध (ब्लॉक) असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, पुन्हा नोंदणी सुरू करण्यासाठी त्यांच्याकडून 190 रुपये दंड वसूल करून केवळ गॅसची नळी हातावर टेकवण्यात आली. हा प्रकार केवळ लूट असून, गॅस चालकांकडून ग्राहकांबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. दुसरीकडे, चपरासी पुरा भागातील ‘गो-गॅस’ केंद्रावर स्वस्त दरात गॅस मिळत असल्याने रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इतर कंपन्यांचे दर प्रति किलो 100 रुपयांपर्यंत पोहोचले असताना, येथे 84.96 रुपयांत गॅस उपलब्ध असल्याने वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे. सर्वत्र गॅसचे दर समान असावेत, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे. दरम्यान, लक्ष्मी गॅस एजन्सीच्या गोंधळामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून पुरवठा अधिकारी प्रवीण राऊत यांनी पोलीस बंदोबस्तात एजन्सीचे टाळे उघडले. काँग्रेसचे समीर जवंजाळ यांनीही याप्रकरणी तक्रार नोंदवली असून, ज्या ग्राहकांना सिलिंडर मिळालेच नाहीत, त्यांच्या नावावर गॅस कोणाला विकला गेला, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनता मात्र होरपळून निघत आहे.
बनावट संदेशांचा मोठा गोरखधंदा?-अनेक ग्राहकांना प्रत्यक्षात गॅस सिलिंडर न मिळताही तो मिळाल्याचे संदेश येत आहेत. समीर जवंजाळ यांच्या तक्रारीनुसार, 20 मार्च रोजी त्यांना गॅस मिळाल्याचा संदेश आला, मात्र घरात सिलिंडर पोहोचलाच नव्हता. आता नवीन नोंदणी करताना थेट 24 एप्रिलची तारीख दिली जात असल्याने यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अचलपूर-परतवाड्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा सांगितले की, शहरात पेट्रोलचा मुबलक साठा उपलब्ध आहे आणि किमती वाढवण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेत जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत माहिती घेतल्याशिवाय कोणत्याही चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नका आणि विनाकारण गर्दी करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सुजाण नागरिक म्हणून संयम राखणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे या घटनेतून दिसून आले.
अफवांना बळी पडू नका!-अचलपूर-परतवाड्यात इंधनाचा पुरेसा साठा असून कोणतीही टंचाई नाही. युद्ध किंवा दरवाढीच्या वावड्या निव्वळ अफवा आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता संयम ठेवावा आणि जीवनावश्यक वस्तूंची अनावश्यक साठवणूक टाळावी. सत्य माहितीवरच विश्वास ठेवा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुबलक साठा उपलब्ध करा! -माझे कॅन्टीन असल्यामुळे आम्हाला पहाटेच कामावर निघावे लागते. मात्र, आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आम्हाला तासनतास रांगेत उभे राहावे लागले. यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. प्रशासनाने इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला, तरच आमच्यासारख्या व्यावसायिकांना अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही. – राजू पंजाबराव तायडे (बालाजी कॅफे, जयस्तंभ चौक)

संबंधित बातम्या

Back to top button