शांतता समितीच्या बैठकीत कायदेविषयक मार्गदर्शन

विविध सामाजिक संघटनांचा सहभाग

अमरावती /26 जून: गाडगेनगर पोलीस स्टेशनच्यावतीने जातीय सलोखा व सामाजिक धार्मिक ऐक्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने शांतता समितीची सभा दिनांक 24 जून रोजी संपन्न झाली. या सभेतकायदेविषयक मार्गदर्शन ही करण्यात आले. विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश तराळ यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी भारतासारख्या बहुसंस्कृतिक देशात जाती व धार्मिक सलोखा आवश्यक आहे सर्व धर्मीयांचे सण सर्व धर्मीयांनी मिळून साजरे करावे असे आवाहन केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या ईद मिलन, रक्तदान शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक कायदा आणि समाजातील अंधश्रद्धा, फसवणूक व बुवाबाजी रोखण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज अधोरेखित केली. या विषयांवर सातत्याने काम करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना व ज्येष्ठ नागरिक मंडळांनी दरमहा संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी मा. गोरखनाथ जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर पोलीस स्टेशन तसेच मा. सुनील चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्पेशल ब्रँच यांनी कायद्याचे पालन, सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तसेच मा. पुरुषोत्तम गावंडे (अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक मंडळ) आणि मा. डी. एस. पवार (अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी संघटना) श्री प्रफुल्ल मंदा श्रीधर( जिल्हा कार्याध्यक अंधश्रद्धा निर्मूलन समिती)यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून सामाजिक प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. सभेस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाचे जिल्हा कार्यवाह मो. अफसर भाई, शुभम दमाहे, प्राचार्य दिलीपसिंह , खांबरे प्राचार्य दादारावजी दाभाडे, श्रीमती पुष्पाताई साखरे देविदासजी कोल्हे, चंदनसिंग राजपूत, संजय खोंडे अनिलराव वानखडे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचा समारोप सामाजिक ऐक्य, कायद्याबाबत जनजागृती आणि अंधश्रद्धामुक्त समाज निर्मितीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याच्या निर्धाराने झाला.

संबंधित बातम्या

Back to top button