‘महात्मा गांधी’ मालिकेतील सर्व जुन्या चलनी नोटा होणार बाद
1 जुलै पासून नवीन नियमावली

मुंबई/26 जून : 2005 सालापूर्वी छापण्यात आलेल्या ‘महात्मा गांधी’ मालिकेतील सर्व चलनी नोटा टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून 1 जुलै 2016 पासून या नोटा स्वीकारण्याची अथवा बदलून घेण्याची सुविधा सामान्य बँकांमध्ये बंद करण्यात आली आहे. आता अशी सोय केवळ रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील 19 प्रादेशिक कार्यालयांमध्येच उपलब्ध असेल, असे मध्यवर्ती बँकेने 9 जून 2026 रोजी देशातील सर्व बँकांच्या प्रमुखांना उद्देशून काढलेल्या परिपत्रकातून स्पष्ट केले आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आदेशानंतर आता व्यापारी बँकांनीही त्याला अनुसरून पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाने 12 जून 2026 रोजी एक अंतर्गत परिपत्रक जारी करून आपल्या सर्व शाखा, क्षेत्रीय कार्यालये आणि चलन पेढ्या अर्थात ‘करन्सी चेस्ट’ना 2005 पूर्वीच्या नोटांबाबत अत्यंत कडक सूचना दिल्या आहेत. बँकेच्या या परिपत्रकामुळे आर्थिक वर्तुळात ही एक प्रकारची टप्प्याटप्प्याने केलेली छुपी नोटबंदी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नोटांवरील ‘महात्मा गांधी’ मालिका बाद-रिझर्व्ह बँकेने 1996 मध्ये पहिल्यांदा सर्व मूल्यांच्या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र छापण्यास सुरुवात केली. या मालिकेला अधिकृतपणे ‘महात्मा गांधी मालिका’ (एमजी सीरिज) असे नाव दिले गेले. सध्या ज्या नोटांवर बँकांनी बंधन आणले आहे, त्या 1996 ते 2005 या काळात छापलेल्या याच पहिल्या मालिकेतील नोटा आहेत. तथापि, 2016 च्या नोटाबंदीनंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने जी नवीन डिझाईन, रंग आणि आकारातील नोटांची मालिका आणली, तिला ‘महात्मा गांधी (न्यू) सिरीज’ असे नाव देण्यात आले. 2005 नंतर छापलेल्या नोटांच्या मागील बाजूच्या तळाशी छपाईचे वर्ष स्पष्टपणे छापलेले असते, त्यावरून ग्राहकांना या दोन वेगवेगळ्या मालिकांतील नोटा ओळखता येतील. बँकांना उद्देशून असलेल्या परिपत्रकात रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आणि नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये अद्ययावत ठेवण्यासाठी जुन्या नोटा चलनातून बाद केल्या जात आहेत. यासाठी बँकांनी निर्देशित नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. बँकांनी कोणत्याही परिस्थितीत 2005 पूर्वीच्या जुन्या नोटा ग्राहकांना एटीएमद्वारे किंवा बँकेच्या खिडकीवरून पुन्हा चलनात वापरात आणण्यासाठी देऊ नयेत. शिवाय बँकेत अशा जुन्या मालिकेतील नोटा आल्यास, त्यांची वर्गवारी करून त्या चलन पेढ्या अर्थात करन्सी चेस्टमध्ये जमा कराव्यात किंवा विल्हेवाटीसाठी रिझर्व्ह बँकेच्या जवळच्या कार्यालयात पाठवाव्यात, असेही सूचित करण्यात आले आहे.




