राज्यसभेसाठी कोणाचेही उंबरठे झिजविले नाही- नवनीत राणा
पहिल्यांदाच जाहीरपणे राजकीय नाट्यावर भाष्य

अमरावती/26 जून- राज्यसभेच्या जागेवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेला पूर्णविराम देत माजी खा. नवनीत राणा यांनी विरोधकांना आणि टीकाकारांना खणखणीत उत्तर दिले आहे. राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी मी कोणाचेही उंबरठे झिजवले नाहीत. पदे येतात आणि जातात, मात्र मी माझ्या विचारधारेवर कधीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगीतले.
युवा स्वाभिमान आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी संत ज्ञानेश्वर महाराज सांस्कृतिक भवनात आयोजित गुणगौरव समारंभात नवनित राणा प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी राजकीय भाष्य केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त राज्यसभा जागेवर नवनित राणा यांना संधी दिल्या जाणार होती. मात्र त्यांच्या एवजी राष्ट्रवादीने राजेंद्र जैन यांची निवड केली. या घटनाक्रमामागील पार्श्वभूमी त्यांनी आज उघड केली.
मी राज्यसभेच्या तिकिटासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे गेले होते, हा प्रचार पूर्णपणे चुकीचा आणि धादांत खोटा आहे. 2024 च्या निवडणुकीत तिकीट मागण्यासाठीही मी कोणाचेही दार ठोठावले नव्हते. मी माझ्या तत्त्वांशी आणि विचारधारेसोबत ठाम उभी आहे. माझी प्राथमिकता ही आगामी लोकसभा निवडणूक असून, त्यादृष्टीने मी पूर्ण ताकदीनिशी तयारी करत आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी मी मैदानात सक्रियअसून, खासदार असताना ज्याप्रमाणे मी अनेक विद्यार्थ्यांसाठी संसद भ्रमणाची संधी उपलब्ध करून दिली होती, तशीच सेवा भविष्यातही पुन्हा करण्याची मला खात्री आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, या भेटी केवळ कामकाजाच्या निमित्ताने होत्या, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, राणांनी आपली आगामी रणनीती स्पष्ट केल्यामुळे राजकीय गोटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना तत्त्वांशी केलेली बांधिलकीच माझ्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
तत्त्वांशी बांधीलकीच माझ्या आयुष्याची शिदोरी-मी सत्तेच्या हव्यासापोटी कधीही झुकणार नाही. विचार आणि तत्त्वे माझ्यासोबत आयुष्यभर राहतील. सध्या माझे संपूर्ण लक्ष केवळ जनसेवा आणि आगामी निवडणुकांवर केंद्रित आहे. मी कोणाचेही दार थोटावले नाही आणि भविष्यातही माझी विचारधारा सोडून कोणताही तडजोड करणार नाही, हे माझे वचन आहे.




