दिल्लीत खा. बळवंत वानखडे, आ. साजिद खान पठाण पोलिसांच्या ताब्यात

अमरावती/21 जुलै – नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचा राग अनावर झाला असतानाच राजधानी दिल्लीत मोठा भडका उडाला. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि न्यायासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे कूच केली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत अमरावतीचे खा. बळवंत वानखडे आणि अकोला पश्चिमचे आ. साजिद खान पठाण यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व अनेक ज्येष्ठ नेत्यांना ताब्यात घेतले. शांततेच्या मार्गाने आंदोलन
करणार्यांवर पोलिसांनी लाठीमार करत दडपशाही सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी करत विरोधकांनी केंद्र सरकारवर लोकशाही पायदळी तुडवल्याचा जोरदार आरोप केला आहे.नीट परीक्षेतील सावळा गोंधळ आणि पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारात सापडले आहे.
विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही, उलट आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. याच अन्यायाविरोधात दिल्लीत ’शिक्षण वाचवा’ आंदोलन पेटले. राजाजी मार्गावरून लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासाकडे
शांततेत चाललेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवले.यावेळी पोलिसांनी अमरावतीचे खा. बळवंत वानखडे, अकोला पश्चिमचे आ. साजिद खान
पठाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिशन ओझा, रघुनाथ मीणा, सुरेश कुमार, महादेव ओझा, बबलू अजीज, रिजवान खान यांच्यासह नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतले. आ. साजिद खान पठाण यांना दिल्ली-हरियाणा सीमेवरील कापसशेडा पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले. या कारवाईनंतर आ. साजिद खान पठाण यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. नीट प्रकरणामुळे देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असून त्यांनी लागलीच राजीनामा दिला पाहिजे. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत आणि आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत खडकासारखे उभे राहू, असा इशारा त्यांनी दिला.विद्यार्थ्यांवरील अत्याचार आणि दडपशाहीविरोधातील हा लढा आता केवळ संसदेपुरता मर्यादित राहिला नसून रस्त्यावर पोहोचला आहे. संविधानाने दिलेला आंदोलनाचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही. अटक करून आवाज दाबण्याचा प्रयत्न कितीही झाला, तरी जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेला हा लढा असाच सुरू राहील, असा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला.आंदोलकांच्या तीन
प्रमुख मागण्या दिल्लीतील या मोठ्या आंदोलनात काँग्रेस आणि आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत.
यामध्ये आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करावी, नीट गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.




